प्रज्ञा मणेरीकर / पणजी
कोरोना व्हायरसने जगभरातील लोकांना रोजच्या दैनंदिन व्यावहारिक जीवनात थांबण्यासाठी भाग पाडले आहे. अशी काही परिस्थिती ओढवेल याचा कुणीही विचारही केला नव्हता. परंतु आपल्या समाजात अशी काही सर्जनशीलता आहे जी आपल्याला मनोरंजन करण्यासाठी सदैव तत्पर असते. यापैकी एक सर्जनशील कलाकार, दिग्दर्शक म्हणजे अनिकेत नाईक. ज्यांनी आपल्या काही कलाकार मित्रमंडळीसोबत या आजारापासून बचावासाठी समाजात जनजागृती करण्यासाठी व गोमंतकीयांना या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्याकरिता प्रोत्साहित करण्यासाठी ‘जैत’ या कोकणी गीताची निर्मिती केली आहे.
गीतातून सकारात्मक राहण्याचा संदेश
काही कोकणी कलाकारांना घेऊन जैत हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. लॉकडाऊन जेव्हा सुरू झाले तेव्हापासूनच या व्हिडिओची कल्पना डोक्यात फिरत होती. आमिजादेसाठी काम केलेले साईश पै पाणंदीकर यांच्याकडेही ही कल्पना सादर केली आणि त्यांनी यात काम करण्यासाठी पाणंदीकर यांनी होकार दिला असे अनिकेत नाईक यांनी सांगितले.
आमिजादे शीर्षक गीताचा वापर
या व्हिडिओसाठी ‘आमिजादे’ या चित्रपटाच्या शीर्षक गीताचा वापर करण्यात आला आहे जे साईश पै पाणंदीकर यांनी लिहिले आहे. खरे आव्हान म्हणजे या गीतात बदल करणे होते. कारण सध्याची परिस्थितीवर, लॉकडाऊनमधील गोमंतकीयांची मानसिक परिस्थितीवर आधारित हे गीत तयार करणे आवश्यक होते. याशिवाय या गीतातून लोकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याकडे लक्ष देणेही गरजेचे होते. त्याप्रमाणे हे आव्हान पाणंदीकर यांनी पेलले असे नाईक यांनी सांगितले.
व्हिडिओतून घरात राहण्याचे आवाहन
या संगीत व्हिडिओचे गीत साईश पै पाणंदीकर यांनी लिहिले असून यातून सध्याच्या परिस्थितीचे वर्णन करण्यात आले आहे. याशिवाय गोमंतकीयांना घरात राहून गोवा सुरक्षित ठेवण्यास मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या व्हिडिओसाठी गायक अनिकेत दड्डीकर यांनी आवाज दिला आहे. याचबरोबर या व्हिडिओमध्ये प्रिन्स जेकब, सलील नाईक, नृत्यदिग्दर्शक पूजा आणि अपर्णा, मिमिक्री कलाकार साईदत्त कामत, यांच्यासह इतर कलाकारांचा समावेश आहे अशी माहिती अनिकेत यांनी दिली.
‘जैत’ व्हिडिओची संपूर्ण प्रक्रिया
या व्हिडिओसाठी साईश पाणंदीकर यांना गीत लिहायला सांगितले आणि त्यांनी दुसऱया दिवशी त्यांनी गीत लिहून दिले. यानंतर एका मधुर गायकाच्या आवाजाच्या आम्ही शोधात होतो. या गीताला साजेसा असा आवाज शोधण्यासाठी अनेक व्हर्च्युअल ऑडिशन्स घेतल्या. अनिकेत दड्डीकर याचा आवाज निवडण्यात आला व त्याच्या आवाजाची रेकॉर्डिंग करण्यात आली. यशस्वीरित्या हा व्हिडिओ तयार झाला.