नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
भारतातील कोरोना परिस्थिती हाताळण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत टीका करणारे ट्विट्स हटवल्याचा आरोप होतोय. सरकारवर टीका करणाऱ्या काही नेते व अभिनेत्यांसह काही जणांनी केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यास केंद्राने ट्विटरला सांगितलं. त्यावरून काही अकाऊंटवरील ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आहेत.
ट्विटरने हटवलेल्या ट्विट्समध्ये व्हेरिफाईड ट्विटर अकाऊंट्सचाही समावेश आहे. यातकाँग्रेसचे नेते रेवंथ रेड्डी, पश्चिम बंगालचे मंत्री मुलोय घातक, अभिनेता विनीत कुमार सिंह आणि चित्रपट निर्माते विनोद कापरी आणि अविनाश दास यांच्यासह काही जणांनी कोरोना आणि कुंभमेळ्याबद्दल केलेल्या ट्विटवर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ट्विटर इंडियाला नोटीस बजावल्यानंतर नमूद करण्यात आलेले ट्विट ब्लॉक करण्यात आले आहेत. ब्लॉक करण्यात आलेले ट्विट भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याचा भंग करणारे होते, असं ट्विटरने म्हटलं आहे.
कोणते विशिष्ट ट्विट्स ब्लॉक करण्यात आले आणि का ब्लॉक करण्यात आले याबद्दल ट्विटरने काहीही जाहीरपणे भाष्य केलेले नाही. ट्विटरकडून ट्विट करण्यात आलेल्या अकाऊंट धारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. भारत सरकारने केलेल्या कायद्याचं ट्विटमुळे उल्लंघन होत असल्याचं म्हटलं आहे. नोटीसमध्ये माहिती तंत्रज्ञान कायदा-2000उल्लेख करण्यात आला असून, त्यानुसार ट्विट्सवर कारवाई करत असल्याचं ट्विटरने म्हटलं आहे.
केंद्र सरकारच्या मागणीनंतर ट्विटरने हटवण्यात आलेल्या बहुतांश ट्विट्समध्ये कोरोना परिस्थिती हाताळण्यावरुन पंतप्रधान मोदींवर प्रखर टीका केलेली होती. तसेच कठोर प्रश्न विचारण्यात आले होते.
कोरोना स्थितीवरून विरोधकांसह पत्रकारांकडूनही मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्ले करण्यात येत आहेत. मागच्या काही दिवसांमध्ये नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करणारा ट्विटर ट्रेंडही आला होता. अशातच ट्विटरने काही ट्विट्स हटवल्याने जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
Previous Articleमहाराष्ट्रात सर्वांना मोफत लस
Next Article माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनाने निधन









