मन की बातमध्ये पंतप्रधानांचे आवाहन : ‘कारगिल’चा संदर्भ : स्वातंत्र्यदिनी शपथ घेण्याचा सल्ला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांना संबोधित केले. सर्वप्रथम कारगिल युद्धातील जवानांच्या शौर्याचे स्मरण करत येत्या स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला ‘कोरोना महामारीपासून स्वतंत्र होण्याची शपथ’ प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर आता युद्ध केवळ सीमेवरच लढले जाते असे नाही. दररोजच्या जीवनातही अनेकांना युद्धाचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाला आपली भूमिका ठरवावी लागेल, असे स्पष्ट करत कोरोना महामारीच्या संकटावर ‘विजय’ मिळविण्याचे सुतोवाच त्यांनी केले.
कारगिल युद्धाला 21 वर्षे पूर्ण झाल्यावर या युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांची त्यांनी आठवण करत श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानने भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैनिकांच्या शौर्याचा विजय झाला, असे ते मोदी म्हणाले. सोशल मीडियावर होणाऱया अपप्रचारासंबंधी बोलताना आपण करीत असलेल्या विचारसरणीचा सीमेवरील सैनिकांच्या मनावर खोल परिणाम होतो. त्यामुळे सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत, असे म्हणाले.
यंदाचा स्वातंत्र्य दिन कोरोना महामारीच्या संकटामध्ये होणार आहे. त्यादृष्टीने देशवासियांनी स्वातंत्र्य दिनाला महामारीपासून स्वतंत्र होण्याची शपथ घेत आत्मनिर्भर भारताचा संकल्प करावा, असे मोदी म्हणाले. तसेच काही नवीन शिकण्याचा आणि शिकवण्याचा संकल्प करावा. आपल्या कर्तव्यांचे पालन करण्याचा निश्चय बाळगावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकमान्य टिळकांचे स्मरण
‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी लोकमान्य टिळक यांचेही स्मरण केले. ‘ज्यांनी राष्ट्रनिर्माणासाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्यापैकीच टिळक हेसुद्धा एक आहेत. लोकमान्य टिळक यांची 1 ऑगस्टला शंभरावी पुण्यतिथी आहे. त्यांचे जीवन आपल्या सगळय़ांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या यशोगाथेने आपणा सर्वांना खूप काही शिकवले आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
कोरोनासंबंधी बेसावधपणा नको!
मागील काही महिन्यांपासून देशाने एकजुटीने कोरोनाचा सामना केला. त्यामुळे अनेक शंका चुकीच्या ठरवल्या. देशातील रिकव्हरी रेट इतर देशांच्या तुलनेत चांगला आहे. मृत्यूदरही कमी आहे. एकाही व्यक्तीला गमावणे चुकीचे आहे. मात्र, देशवासीय कोरोनाशी समर्थपणे लढा देत आहेत. अजूनही धोका संपलेला नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्यासह कुटुंबाची योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास देशही आपोआपच कोरोनाला हरवू शकेल, असा दावा पंतप्रधानांनी केला.
आत्मनिर्भरतेकडे यशस्वी वाटचाल
योग्य दृष्टीकोन असेल तर संकटाचे संधीत रुपांतर केले जाऊ शकते. लोकांनी कौशल्याच्या जोरावर नवीन उद्योग सुरू केले आहेत. बिहारमध्ये लोकांनी मधुबनी पेंटिंगचे मास्क बनवणे सुरू केले आहे. आसामच्या कारागिरांनी बांबूचे टिफिन आणि बॉटल बनवणे सुरू केले आहे. हे इकोप्रेंडलीही असते. झारखंडच्या परिसरात काही समूह लेमनग्रासची शेती करत आहेत. याच्या तेलाची आजकाल मागणीही आहे. दोन्ही ठिकाणे हजारो कि.मी. अंतरावर आहेत. मात्र भारताला आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने काम करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.









