20 रिपोर्ट निगेटिव्ह, नवीन 6 दाखल : अत्यावश्यक वेळांमध्ये सुधारणा
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ातील नागरिकांनी लॉकडाऊन कडक पाळण्यास सुरुवात केली असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आलेले गांभीर्य आता कोरोनाला हरवण्याच्या लढाईत उपयुक्त ठरणार आहे. गेल्या दोन तीन दिवसात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत नसल्याने आणि अनुमानित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह येत असल्याने प्रशासनासह जिल्हावासियांना दिलासा लाभत आहे. मात्र कडक लॉकडाऊन पाळण्याची अत्यंत गरज असून तो निर्धार जिल्हय़ातील जनतेने केल्याने लवकरच सातारा जिल्हा ग्रीन झोनमध्ये जाण्याची आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, मंगळवारी 20 अनुमानितांचे अहवाल निगेटिव्ह आले असून नवीन 6 अनुमानित दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. तर अत्यावश्यक सेवांसाठी सुधारित वेळेचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले असून प्रशासनाकडून भावनिक आधारासाठी 1077 ही मोफत हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे काल दि. 13 एप्रिल रोजी रात्री उशिरा श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे 3 नागरिकांना व सोमवारी 2 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे कोरोना अनुमानित म्हणून विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. तर कराड उप जिल्हा रुग्णालयात 1 नागरिकास अनुमानित रुग्ण म्हणून, अशा एकूण 6 जणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्व 6 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.
गेल्या दोन तीन दिवसात बाधित रुग्णांच्या सहवासात आलेल्या अनुमानित नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. जावली तालुक्यातील निझरे हॉटस्पॉट बनला असला तरी परिस्थिती नियंत्रणाखाली असून नव्याने कोणीही बाधित आढळून येत नसल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. सोमवारी देखील जिल्हा रुग्णालय सातारा येथे 15 व कृष्णा मेडिकल कॉलेज येथे दाखल असणाऱया 5 अशा एकूण 20 अनुमानितांचे अहवाल निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याचे डॉ. गडीकर यांनी सांगितले.
दि. 14 रोजीची सायं- 5 वाजताची जिल्हा कोरोना अचूक आकडेवारी
1.जिल्हा शासकीय रुग्णालय-257
2.कृष्णा हॉस्पीटल, कराड-184
3.खाजगी हॉस्पीटल-4
4.एकूण दाखल -445
प्रवासी-116, निकट सहवासीत-232,
श्वसन संस्थेचा जंतू संसर्ग-97 एकूण 445
5.14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-4
6. कोरोना नमुने घेतलेले एकूण-449
7.कोरोना बाधित अहवाल -7
8.कोरोना अबाधित अहवाल -421
9.अहवाल प्रलंबित -17
10.डिस्चार्ज दिलेले-422
11.मृत्यू -2
12.सद्यस्थितीत दाखल- 21
13.आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 14.4.2020) -876
14.होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -876
15.होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -558
16.होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती ा318
17.संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-149
18.आज दाखल-16
19.यापैकी डिस्जार्ज केलेले-74
20.यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-0
21.अद्याप दाखल -75
अत्यावश्यक बाबींचे सुधारित वेळांचे नियोजन
किराणा, धान्य दुकाने, मिलीट्री कॅन्टीन, डिमार्ट व दुध सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9, भाजीपाला दुकान स. 8 ते 11, घरपोच भाजीपाला व किराणा माल दिवसभर, औषधे दुकाने सकाळी 8 ते 11 व सायं 7 ते 9, हॉस्पीटलमधील औषधे दुकाने स. 8 ते 11 व सायं 7 ते 9, पेट्रोल व डिझेल पंप स. 8 ते 11 व सायं 7 ते 9, ऍम्ब्युलन्ससाठी कायमस्वरुपी खुले तर कृषी सेवा केंद्रे, बियाणे खते, किटकनाशके यांची दुकाने स. 8 ते 11 व सायं 7 ते 9, राष्ट्रीयीकृत व्यावसायिक बँका स. 8 ते 11 सर्व नागरिकांसाठी. एलपीजी गॅस पुरवठा दिवसभर तर स्वस्त धान्य दुकाने स. 8 ते 11 व सायं 7 ते 9, अत्यावश्यक सेवेच्या इतर सर्व आस्थापना स. 8 ते 11, प्रसार माध्यमांची अधिकृत कार्यालये दिवसभर राहतील. पेपर विक्री व्यवसाय दुकाने सकाळी 11 पर्यंत, ग्रामीण व नागरी भागातील सर्व पोष्ट कार्यालये, एमएसईबी, दुरसंचार विभाग दिवसभरासाठी चालू राहतील. कृषि अवजारे, ट्रक्टर पंप, कृषिविषयक स्पेअरपार्ट व दुरुस्ती केंद्रे सकाळी 8 ते 11 आणि खासगी हॉस्पीटल/खासगी डॉक्टर सेवा दिवसभर राहणार आहे.
1077 हेल्पलाईनवर मानसिक आधार
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या पुढाकाराने चालणाऱया 1077 ह्या टोल फ्री हेल्प लाईन वर मानसिक आधार आणि समुपदेशनाची देखील सुविधा आता उपलब्ध आहे. उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. अधिकारी, परिवर्तन संस्था, महाराष्ट्र अंनिस आणि काही समविचारी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून मनोबल हेल्प लाईनच्या वीसपेक्षा अधिक तज्ञ समुपदेशक आणि प्रशिक्षित मानस मित्र आणि मैत्रिणी ह्यांच्या माध्यमातून हि सुविधा चालवली जाणार आहे. मनोविकार तज्ञ डॉ. हमीद दाभोलकर, समुपदेशक रुपाली भोसले, योगिनी मगर आणि राणी बाबर ह्याचे समन्वयाचे काम पाहणार आहेत.







