दोन्ही लाटांमध्ये गावामध्ये नाही कोणीही पॉझिटिव्ह : ही तर रवळनाथ आणि ठाणेश्वराची कृपा! – ग्रामस्थांची श्रद्धा
- गावची लोकसंख्या 1800, घरे 400, वाडय़ा 12
- लसीच्या मागे न लागता गाववाले भात कापणीत मग्न
शेखर सामंत / सिंधुदुर्ग:
हे सांगून कुणाला पटणार नाही, पण यावर विश्वास ठेवावाच लागेल. हो! आपला जिल्हा व विशेषत: जिल्हय़ाचा ग्रामीण भाग कोरोनाच्या वणव्यात होरपळून निघत असताना याच जिल्हय़ातील 1800 लोकवस्तीच्या वायंगणी (मालवण) गावाने मात्र या कोरोनाच्या दोन्ही लाटा गावाच्या वेशीबाहेर थोपवून धरण्यात यश मिळवलंय. 400 घरे आणि 12 वाडय़ांच्या या गावात मुंबईकर येऊन देखील या दोन्ही लाटेत मृत्यू तर सोडाच, साधा एक पॉझिटिव्ह रुग्णदेखील सापडू शकलेला नाही. आहे की नाही कमाल या वायंगणी गावाची.
वायंगणी गाव म्हटला की, डोळय़ासमोर येतो तो बारगळलेला सी-वर्ल्ड प्रकल्प, वायंगणी गाव म्हटला की, डोळय़ासमोर येते ती शेकडो वर्षांची परंपरा असलेली अनोखी गावपळण. वायंगणी गाव म्हटला की, डोळय़ासमोर येते ती देवमळय़ातील अनोखी शेती. श्री देव रवळनाथ व श्री देव ठाणेश्वरावर अपार श्रद्धा ठेवणारा हा गाव. धार्मिक प्रथा, परंपरा मानणारा, निसर्गावर भरभरून प्रेम करणारा हा गाव. पश्चिमेचा अरबी समुद्र आणि दक्षिणेची कालावल खाडी या कोंदणात वसलेला हा गाव अलिकडे आणखी एका कारणाने चर्चेत आला आहे. साहजिकच ही चर्चा आहे कोरोनाची. या कोरोनाने असंख्य बळी घेऊन सिंधुदुर्गात भीतीचा कोहराम माजवला असताना, या वायंगणी गावाने मात्र या दोन्ही लाटांमध्ये या कोरोनाला गावाच्या वेशीच्या आत पाऊलही टाकू दिलेलं नाही. अगदी गावात मुंबईकर येऊन देखील कोरोनाची या गावात घुसण्याची हिंमत झालेली नाही. वायंगणीकरांनी हा चमत्कार कसा काय घडवून आणला हे जाणून घेणं खरोखरच औत्सुक्याचं ठरेल.
संपूर्ण गाव भात कापणीच्या कामात व्यस्त
सध्या गावागावांत लसीकरणासाठी धावपळ सुरू आहे. मृत्यूच्या भयाने लस मिळविण्यासाठी लोक रांगा लावत असताना या गावातील बहुतांश लोक मात्र सुप्रसिद्ध देवमळय़ातील भात कापणीत व्यस्त असलेले दिसून येत आहेत. ना त्यांच्या चेहऱयावर कोरोनाची भीती, ना त्यांच्या मनात लस मिळेल का नाही याची धाकधूक. ‘जोपर्यंत ग्रामदैवत श्री देव रवळनाथाची आणि श्री देव ठाणेश्वराची कृपादृष्टी आहे, तोपर्यंत कोरोनाच्या कितीही लाटा येवोत. या गावातील कुणाच्याही केसालाही कोरोना धक्का लावू शकणार नाही, ही त्यांची ठाम श्रद्धा.
मुंबईकर येऊनही कोरोना नाही
कोकणात कोरोना आला तो मुंबईकर चाकरमान्यांमुळे, असा बहुतांश समज आहे आणि काहीअंशी तो खराही आहे. परंतु, थक्क करणारी बाब म्हणजे या गावातही मुंबईकर शेती आणि देवाच्या कार्याकरिता आले. परंतु या मुंबईकरांच्या बरोबरीने मात्र या कोरोनाला या गावात शिरकाव करता आलेला नाही. नाही म्हणायला या दुसऱया लाटेत एक मुंबईकर कोरोनासदृश लक्षणे घेऊन आल्यासारखा वाटत होता. परंतु, तो गावातील आपल्या घरी चार दिवस राहिल्यानंतर बरा झाला. या व्यतिरिक्त पहिल्या आणि आताच्या लाटेत कोरोनाची एकही घटना या गावात घडली नाही. मात्र असं असलं, तरी या गावातील लोक स्वैर वागत नाहीत. माक्स लावणे, सोशल डिस्टन्सिंग, गर्दी टाळणे, स्वच्छता या बाबतची कोरोना विरुद्धची त्रिसुत्री अतिशय शिस्तबद्ध पाळतात. गावात आलेला मुंबईकर क्वारंटाईन काळात गावभर फिरत नाही. तो आपली जबाबदारी ओळखून क्वारंटाईनचे सर्व नियम मनापासून पाळतो. त्यामुळे गावात कोरोनाला शिरकाव करणे कठीण झाले आहे.
देवमळय़ात भात कापणीला सुरुवात
सध्या गावात देवमळय़ातील भात कापणीला सुरुवात झाली आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या देवमळय़ातील अडीचशे एकर क्षेत्रातील भात कापणी करण्यासाठी मुंबईकर, गाववाले आवर्जून हजेरी लावतात. मात्र मागील वर्षभरापासून मुंबईतील कोरोनामुळे गावाला त्रास होऊ नये म्हणून मुंबईकर कमी संख्येने गावात दाखल झालेत. मात्र गाववाल्यांनी भात कापणीच्या कामात खंड पडू दिलेला नाही. गावातील रामेश्वर मंदिरात नुकत्याच झालेल्या वसंतोत्सवाप्रसंगी तारीख निश्चित करून या कापणीस सुरुवात करण्यात आली. ही कापणी आणखी सहा ते सात दिवस चालेल. या वर्षी भाताचे अमाप पिक आले असून हा देखील श्री देव रवळनाथाचाच आशीर्वाद असल्याची ठाम श्रद्धा या गाववाल्यांची आहे.
ही ग्रामदेवतेची कृपा – दुखंडे
‘तरुण भारत’शी बोलताना या गावचे रहिवासी उदय दुखंडे म्हणतात, कोरोनाचा बिमोड ही ग्रामदेवतांची गावावरची कृपाच होय. या ग्रामदेवतांवर येथील ग्रामस्थांची अपार श्रद्धा आहे. देवतेचा आशीर्वाद असला, तरी येथील ग्रामस्थ कधी स्वैर वागत नाहीत. ते सदैव मर्यादेतच राहतात. कोरोनाला दूर ठेवायचे असेल, तर काही नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, याची जाण गावातील प्रत्येक ग्रामस्थाला आहे. त्यामुळे कोरोनाची या गावापुढे डाळ शिजू शकलेली नाही. देवमळय़ातील शेतीबाबत बोलायचे, तर अनेक वर्षांची परंपरा असलेली व देवाच्या आज्ञेवर चालणारी ही महाराष्ट्रातील एकमेव सामुदायिक शेती.
काही का असेना सी वर्ल्डसारखा प्रकल्प झुगारून पर्यावरणाचा आदर राखणाऱया प्रथा, परंपरा जोपासणाऱया या गावाने ज्या पद्धतीने गावाच्या वेशीवर लक्ष्मण रेषा आखून कोरोनाला रोखून धरलंय, त्याला दाद दिलीच पाहिजे.









