वैज्ञानिकांनी कोरोनाला पूर्णपणे नष्ट करणाऱया एका मॉलिक्यूलचा शोध लावला आहे. हा मॉलिक्यूल सामान्य अँटीबॉडीच्या तुलनेत 10 पटीने लहान आहे. या ड्रगचे नाव एबी8 असून त्याचा वापर कोरोनावरील उपचारात केला जाऊ शकतो. हे औषध कोरोना मानवी पेशींशी संलग्न होऊ देत नाही तसेच याचा आतापर्यंत कुठलाच दुष्परिणाम दिसून आला नसल्याचे कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले आहे.
उंदरांवर परीक्षण
संशोधनात भारतीय वंशाचे वैज्ञानिक श्रीराम सुब्रह्ममण्यम यांचा समावेश आहे. उंदराला हे औषध दिल्यावर कोरोनापासून बचावासह त्याचा उपचारातही वापर करता येत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. हा अत्यंत छोटा मॉलिक्यूल असून तो कोरोना विषाणूला नष्ट करतो. हे औषध अनेक प्रकारे रुग्णांना दिले जाऊ शकते. औषधाचा वास हुंगूनही शरीरात पोहोचविले जाऊ शकते.
उपचाराप्रमाणे काम करणार
एबी8 कोविड-19 च्या रुग्णांमध्ये उपचारपद्धतीप्रमाणे काम करणार आहे. मानवी अँटीबॉडीमधील एक हिस्सा व्हीएच डोमेनने मिळून तयार झालेला असतो. हा एबी8 देखील तसाच असल्याची माहिती संशोधक जॉन मेलर्स यांनी दिली आहे. सद्यकाळात कोरोनातून बरे झालेल्यांच्या प्लाझ्मातून बाधितांवर उपचार केला जात आहे. त्यांच्या प्लाझ्माममध्ये असणाऱया अँटीबॉडीज रुग्णांना संसर्गाशी लढण्यास मदत करतात. परंतु मोठय़ा प्रमाणावर रुग्णांचा उपचार करता येईल अशा प्रमाणात प्लाझ्मा उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. याचमुळे संशोधक जीनला वेगळे करून अँटीबॉडी प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाप्रकारच्या अँटीबॉडीच्या उत्पादनाचीही तयारी सुरू आहे.









