बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यांना यापुढे थेट कोरोना लस घ्यावी लागणार नाही. केंद्राने सर्व राज्यांना मोफत लस पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यांनी त्यांना मिळालेल्या लसी त्यांच्या राज्यातील नागरिकांना टोचण्याचे उत्तरदायित्व घ्यायचे आहे, असे पंतप्रधांनी म्हंटले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या या घोषणेवर कर्नाटक काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे. उशिरा का असेना पण चांगला निर्णय घेतला असे काँग्रेसने म्हंटले आहे. तसेच लस खरेदीची जबाबदारी घेण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे, ” असे म्हंटले आहे. तसेच कोरोनाला पराभूत करण्यासाठी भारताला दिवसाला १ कोटी लोकांना लस देण्याची गरज असल्याचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी म्हंटले आहे.
दरम्यान कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाचे आभार. ज्यामुळे केंद्र सरकारला निर्णय घेणे भाग पाडले. आता कर्नाटक सरकारने लसींच्या समान वितरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे, ” असे ते म्हणाले.
तसेच त्यांनी ट्विट केले की, “भारत अजूनही आपल्या लसीकरणाचे धोरण शोधत आहे. जर आम्हाला हा अधिकार मिळाला असता तर त्याचे दोष सुधारले असते. जर फक्त #राहुलगांधीजींचे भाजपने म्हणणे ऐकले असते तर आम्ही दुसऱ्या लाटेत लाखो लोकांचे जीव वाचवू शकलो असतो. दरम्यान कोरोनाला पराभूत करण्यासाठी भारताला दिवसाला १ कोटी लोकांना लसी देण्याची गरज आहे. ”









