कंग्राळी बुद्रुक येथे कोरोनायोद्धय़ांचा सत्कार : चिकुनगुनिया लस वितरण
वार्ताहर /कंग्राळी बुदुक
प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे कोरोना महामारी नियंत्रणात येण्यास वेळ लागला. परंतु डॉक्टर व आशा कार्यकर्त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे जीव वाचवण्याचे महान कार्य केले आहे. यापुढेसुद्धा त्यांनी आपले कार्य असेच सुरू ठेवून कोरोना हद्दपार करण्यासाठी सहकार्य करण्याचे विचार म. ए. शहर युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी व्यक्त केले.
कंग्राळी बुद्रुक येथे म. ए. युवा आघाडी व कलमेश्वर युवक मंडळातर्फे आयोजित कोरोनायोद्धय़ांचा सत्कार व चिकुनगुनिया आजारावरील औषधांचे डोस वितरण कार्यक्रम रविवारी गावचे जागृत देवस्थान कलमेश्वर मंदिर आवारात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष नारायण पाटील होते.
व्यासपीठावर श्रीराम सेनेचे जिल्हा अध्यक्ष रमाकांत केंडुसकर, म. ए. समिती ग्रामीण युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, कोरोनायोद्धा डॉ. इम्रान अंबिगेर, खानापूर म. ए. समिती युवा आघाडी अध्यक्ष धनंजय पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्र कडोलीच्या साहाय्यक आरोग्य अधिकारी वर्षा घोडके, कोरोनायोद्धे डॉक्टर व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. शिक्षक पुंडलिक पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.
यावेळी कोरोना योद्धे डॉ. इम्रान अंबिगेर, डॉ. राजेश उदगडगी, डॉ. अनिल कोवाडकर, डॉ. संजीव पाटील, डॉ. शंकर हुरुडे, डॉ. पुजारी, डॉ. सूरज अनगोळकर, डॉ. गौतम जगताप, डॉ. ताबीज अहमद, डॉ. तेजस्वी शिंदे, डॉ. रिना मॅडम, आशा कार्यकर्त्या अनिता पाटील, महादेवी माळगी, म्हेत्री, कुरती मोरे, ज्योती, शोभा पाटील, बडिगेर आदी कोरोनायोद्धय़ांचा शाल व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व कोरोनायोद्धे भरत जागर गाणी व महेश जाधव यांनी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या सुमारे 450 जणांवर अंत्यसंस्कार करण्याचे महान कार्य केल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला.
झाडा लावा झाडे जगवा
यावेळी प्रत्येक कोरोना योद्धय़ांना एक रोपटे देऊन त्याची स्वतः लागण करून परिसरामध्ये स्वच्छ हवा राखण्याचे कार्य करण्यासाठी व पर्यावरणाला समतोल ठेवण्यासाठी ‘अधिक झाडे लावा व अधिक झाडे जगवा’ असा संदेश दिला.
रोग प्रतिबंधक डोसचे वितरण
यावेळी उपस्थित डॉ. इम्रान अंबिगेर, ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, संतोष मंडलिक, धनंजय पाटील, मयूर बसरीकट्टी, मल्लाप्पा पाटील, ग्रा. पं. सदस्य तानाजी पाटील, प्रशांत पवार, निवृत्त जवान रामा तारिहाळकर आदींच्या हस्ते उपस्थितांना चिकुनगुनिया आजारावरील रोग प्रतिबंधक डोस देण्यात आला. यावेळी 500 नागरिकांनी याचा लाभ घेतला.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले, कोरोना काळामध्ये आपली सेवा बजावताना डॉक्टर व अनेक शिक्षकांना कोरानाची लागण होऊन मृत्यूला सामोरे जावे लागले. त्या महान कोरोनायोद्धय़ांना अभिवादन केले. तसेच कोरोना महामारी संपुष्टात आणण्यासाठी सर्वांनी तोंडावर मास्क लावणे व सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कलमेश्वर युवक मंडळच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शिक्षक पुंडलिक पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत पवार यांनी आभार मानले.









