राज्यातील 100 मंदिरांमध्ये सामूहिक विवाहांचे होणार आयोजन
प्रतिनिधी /बेंगळूर
धर्मादाय खात्याकडून आयोजित करण्यात येणारे सप्तपदी सामूहिक विवाह कार्यक्रम कोरोना परिस्थितीमुळे स्थगित झाले होते. आता ही महत्त्वाकांक्षी योजना पुन्हा सुरू करण्यात येत असल्याची माहिती मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी दिली आहे. राज्यातील निवडक 100 मंदिरांमध्ये राज्य सरकारच्यावतीने सप्तपदी योजनेंतर्गत सामूहिक विवाहांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शिमोगा येथे बुधवारी कोटे श्री रामांजनेय मंदिराला मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्यासमवेत भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात धर्मादाय खात्यातील अधिकाऱयांची बैठक घेऊन त्यांनी चर्चा केली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सप्तपदी योजनेंतर्गत विवाह करणाऱया वधुला 40 हजार रुपये किमतीचे दागिने तसेच 10 हजार रुपये रोख व साडी देण्यात येईल. तर वराला 5 हजार रुपये देण्यात येतील. या कार्यक्रमासाठी मुहूर्त निश्चित करण्यात आला असून आवश्यक तयारी करण्याची सूचना खात्यातील अधिकाऱयांना देण्यात आली आहे.
सर्वसामान्य नागरीक धुमधडाक्यात लग्न सोहळय़ाचे आयोजन करण्याऐवजी साधेपणाने समारंभाचे आयोजन करण्यास प्राधान्य देताना दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आयोजित होणाऱया सामूहिक विवाह कार्यक्रमाचे महत्त्व वाढले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.









