प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे बळीराजा संकटात आला आहे. कोरोना आता सर्वत्रच समाजामध्ये पसरू लागला आहे. त्यामुळे त्याची शेतकऱयांनाही लागण होत आहे. यातच बोगस बियाणांमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. तेव्हा शेतकऱयांना सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरोना आता ग्रामीण भागात पसरला आहे. तेव्हा शेतकऱयांच्या आरोग्याची काळजी, शेतकऱयांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी सरकारने घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भू-संपादन कायदा करण्यात आला आहे, तो कायदा रद्द करावा. त्या कायद्यामध्ये सुधारणा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱयांना देण्यात येणारी कर्जे वेळेत द्यावीत, कोरोनामुळे मोठा फटका बसला असून ती कर्जे माफ करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एका कंपनीने शेतकऱयाला दिलेला ट्रक्टर खराब निघाला आहे. तो ट्रक्टर वारंवार दुरुस्तीसाठी बेळगावला आणावा लागत आहे. त्या ट्रक्टरची कंपनी मात्र वेगवेगळी उत्तरे त्या शेतकऱयाला देत आहे. तेव्हा त्या ट्रक्टरचा पंचनामा करून आम्ही तो ट्रक्टर सदर कंपनीला परत करणार असून शेतकऱयाला दिलेले कर्ज पूर्णपणे माफ करावे, अशी मागणीही करण्यात आली.
निवेदन देण्यासाठी सिद्धाप्पा मोदगी, हणमंत गुरव, लक्ष्मण बामणे, शिवाजी मंडोळकर, कृष्णा बिर्जे, शिवाजी जांबोटी, तातोबा खामकर, लक्ष्मण तारिहाळकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.









