नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अशा स्थितीमध्ये ओडिसा सरकारने भगवान जगन्नाथ यांचे मुख्य निवासस्थान असलेल्या पुरी वगळता राज्यातील सर्व ठिकाणी होणाऱ्या रथयात्रा उत्सवावर बंदी घातली आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे भाविकांशिवाय पुरी रथयात्रा निघणार आहे. कोरोना नियमाचे पालन करून ही रथयात्रा काढण्यात येणार आहे.
ओडिसाचे विशेष मदत आयुक्त प्रदीप के. जेना यांनी याबद्दल माहिती देत म्हटले आहे की, १२ जुलैपासून सुरू होणारी पुरी रथयात्रा भाविकांशिवाय केवळ सेवकांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचनांचे कठोरपणे पालन यंदाच्या वर्षी देखील करण्यात येणार असल्याचे त्यांने सांगितले आहे.
ओडिसा सरकारने नेहमीच लोकांच्या सुरक्षिततेला महत्त्व दिले आहे. ओडिसासह अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात हा रथयात्रा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे या उत्सवात लोक देखील मोठ्या संख्येने सहभागी होतात. या सगळ्या स्थितीचा विचार करून यावर बंदी घालणे गरजेचे आहे. तसेच कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट असलेल्या व लसीकरण केलेल्या सेवकांना रथयात्रा विधींमध्ये सहभाग घेण्याची परवानगी दिली जाणार असल्याचे देखील, ओडिसाचे विशेष मदत आयुक्त प्रदीप के जेना यांनी यावेळी सांगितले.









