म्हैसूर/प्रतिनिधी
म्हैसूरमधील चामुंडी टेकडीवरील श्री चामुंडेश्वरी मंदिर शहरातील वाढत्या कोरोनाच्या संख्येमुळे बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. उपायुक्त रोहिणी सिंधुरी यांनी श्री चामुंडेश्वरी मंदिर १८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या काळात याठिकाणी सार्वजनिक प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, १७ ऑक्टोबर रोजी मंदिरात म्हैसूर दसाराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. यावेळी उद्घाटनाला येणाऱ्या निमंत्रक, अधिकारी आणि इतर कर्मचार्यांच्या वाहनांना १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान प्रवेश देण्यात येणार आहे, असे उपायुक्तांनी सांगितले आहे.
दरम्यान कोरोनामुळे म्हैसूर प्राणीसंग्रहालय, म्हैसूर पॅलेस आणि श्रीकंतेश्वरा मंदिर अशी सर्व पर्यटन स्थळे नोव्हेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद राहतील असे उपायुक्त रोहिणी सिंधुरी यांनी सांगितले आहे.









