जि.प.च्या स्थायी समिती सभेत निर्णय, सेस फंडातून केली जाणार तरतूद
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा परिषदेचे 25 हजार कर्मचारी कोरोना विरोधात लढा देत आहेत. विशेषतः स्थानिक पातळीवर सर्व्हे, स्वच्छता मोहिम आणि आरोग्य सेवेमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱया कर्मचाऱयांच्या जिवितास मोठा धोका आहे. एखाद्या कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटूंब उघडय़ावर पडेल. त्यामुळे कोरोना विरोधात लढणाऱया कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटूंबियांना सेस फंडातून पाच लाख रूपयांची मदत देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत झाला.
अध्यक्ष बजरंग पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सभा पार पडली. यावेळी उपाध्यक्ष सतीश पाटील, सीईओ अमन मित्तल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, समिती सदस्य अरुण इंगवले, युवराज पाटील, राहूल आवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ आदी उपस्थित होते. तर राहूल पाटील, जयवंतराव शिंपी, विलास भोगम यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी घरातूनच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सभेमध्ये सहभाग नोंदवला. पण यावेळी लाईन क्लिअर नसल्यामुळे व्ही.सी.द्वारे सहभागी झालेल्या सदस्यांचा सभेमधील संवाद खंडीत होत होता. त्यामुळे काही काळ अडथळा निर्माण झाला. त्यामुळे यापुढे व्हि.सी.द्वारे सभा घ्यायची असेल तर प्रशासनाने सर्व तांत्रिक बाबी सुसज्ज ठेवाव्यात अशी सूचना उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी दिली.
राहूल आवाडे यांनी कोरोना विरोधात लढणाऱया जि.प. कर्मचाऱयांचा कोरोनाबाधित होऊन मृत्यू झाल्यास पाच लाख रूपये मदत निधी देण्याची मागणी केली. या मागणीवर काही सदस्यांनी आक्षेप नोंदवला. पण तो खोडून काढत आवाडे आपल्या मागणीवर ठाम राहिले. यावेळी जि.प.तील 25 हजार कर्मचाऱयांना शासनाने विमा संरक्षण दिले असले तरी जि.प.मधूनही याबाबत काही करता येईल काय ? याबाबत चर्चा झाली. पण सद्यस्थितीत बहुतांशी कंपन्यांनी इन्शुरन्स देण्याबाबत नकार दिला आहे. त्यामुळे ज्या कर्मचाऱयांचा कोरोनामुळे मृत्यू होईल, त्यांच्या कुटूंबियांना 5 लाख मदत निधी देण्याची आवाडे यांनी मागणी केली. याची दखल घेऊन जि.प.च्या सेस फंडातून 5 लाखांची मदत देण्याबाबत सभेमध्ये ठराव करण्यात आला.
रस्ते, नळपाणीपुरवठा योजनांची कामे तत्काळ मार्गी लावण्याचा निर्णय
आगामी मान्सून पावसापूर्वी ग्रामीण रस्ते व नळ पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीची कामे तत्काळ मार्गी लावण्याचा सभेमध्ये निर्णय झाला. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे बहुतांशी ग्रामीण रस्ते पूर्णपणे खराब झाले आहेत. तसेच नळ पाणीपुरवठा योजनांनाही अतिवृष्टी व महापूराचा फटका बसला आहे. ग्रामीण जनजीवनासाठी या दोन बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यामुळे येत्या महिनाभरात ही सर्व कामे तत्काळ मार्गी लावण्याचा सभेत निर्णय झाला. यासाठी आवश्यक निधीसाठी त्वरीत निधी मंजूर करण्याच्या सूचना उपाध्यक्ष सतीश पाटील व बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी दिल्या.