जिल्हाधिकाऱयांकडून आरोग्याधिकाऱयांना बैठकीत सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनासारख्या महाभयंकर आजारामुळे अनेक कुटुंबांचा कर्ता हरपला आहे. त्यामुळे ती कुटुंबे अडचणीत आली आहेत. तेव्हा गेल्या वर्षभरात कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी आरोग्य विभागाने पाऊल उचलावे, अशी सूचना जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेऊन त्यांनी आरोग्याधिकाऱयांना ही सूचना केली आहे. कोरोनामुळे अनेकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. अनेक कुटुंबे बेवारस झाली आहेत. त्यांचा उदरनिर्वाह होणेदेखील कठीण झाले आहे. नुकसानभरपाईसाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत. मात्र आरोग्य विभागाकडून त्यांना कागदपत्रांची नितांत गरज आहे. कोणीही जर कागदपत्रांसाठी आले तर त्यांना सर्व कागदपत्रे तातडीने द्या, असे त्यांनी सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे नोंद झालेल्या व्यक्तीची कागदपत्रे देण्यास कोणीही टाळाटाळ करू नका. उलट त्यांना कागदपत्रे देऊन नुकसानभरपाई देखील मिळवून देण्यासाठी मदत करा, अशी सूचना केली आहे.
या बैठकीला अप्परजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. शशिकांत मुन्याळ, बिम्सचे संचालक डॉ. आर. जी. विवेकी, तालुका आरोग्याधिकारी बसवराज मास्तीहोळी, डॉ. बाळकृष्ण तुक्कार यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









