प्रतिनिधी / ओरोस:
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्न प्रशासनाकडून मार्गी लावण्यात आला आहे. ओरोस येथील प्राधीकरण क्षेत्राच्या स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कुसबे-पोखरण येथील हरिश्चंद्र विठोबा पांगम यांना मृतदेहांवर अंत्यविधीसाठीचा ठेका देण्यात आला आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे नातेवाईकांची होणारी परवडही आता थांबणार आहे.
जिल्हय़ात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करताना योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. नातेवाईकांकडून अंत्यविधी झाल्यास विषाणू संक्रमणाची भीती मोठी असल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी नवनगरविकास प्राधीकरण क्षेत्रातच याबाबतची सोय करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठेकेदार नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. दरम्यान कुसबे-पोखरण येथील हरिश्चंद्र पांगम यांचा अर्ज मंजूर करण्यात आला असल्याची माहिती प्राधिकरण अध्यक्ष तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिली.
प्राधीकरण क्षेत्रातील भूखंड क्रमांक 157 क्षेत्र 0.46.0. हे. आर हा भूखंड स्मशानभूमी (सार्वजनिक उपयोगिता) या प्रयोजनासाठी आरक्षित ठेवण्यात आला असल्याचे जोशी यांनी जाहीर केले. अंत्यविधी करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामध्ये सदरचे कामकाज करताना केंद्र सरकार तसेच राज्य सरकार यांच्याकडून प्राप्त सूचना व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. स्मशानभूमीलगतच्या रहिवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. सदर कामासाठी कमीत कमी व जास्त जास्त तीन ते चार कामगार वापरावे. कामकाज करताना कामगारांना आवश्यक ते सॅनिटायझर, मास्क, पी. पी. ई. किट्स इत्यादी पुरवावे. कामकाजाबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार उद्भवणार नाही, याची दक्षता घ्यावी. दहन कार्य प्रत्यक्ष सुरू करण्यापासून ते पूर्ण होईपर्यंत ठेकेदार यांनी त्यांच्या देखरेखीखाली ते काम पूर्ण करावे. मृतदेह पूर्णपणे दहन होईपर्यंत समक्ष थांबण्याचे आहे. मृतदेह दहन करण्यासाठी आवश्यक ते साहित्य (उदा. लाकडे, रॉकेल, वाहन) ठेकेदार यांनी त्यांच्या स्तरावर उपलब्ध करून घ्यायचे आहे. अंत्यविधीचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर अंत्यविधीसाठी वापरात आणलेल्या साहित्याची (उदा. मास्क, पी. पी. ई. कीट, हातमोजे इत्यादी) रितसर विल्हेवाट लावण्यात यावी. काम पूर्ण झाल्यानंतर तसा अहवाल या कार्यालयाकडे तसेच जिल्हा रुग्णालयाकडे सादर करावा. अंत्यविधीच्या पूर्ण प्रक्रियेवर म्हणजेच जिल्हा रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यापासून ते अंत्यविधी पूर्ण होईपर्यंतचा होणारा खर्च प्रति मृतदेह 15 हजार रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. ठेकेदार यांनी प्रत्येक मृतदेहाचे दहन केल्यानंतर त्याचा स्वातंत्र अहवाल मृत्यू प्रमाणपत्रासह विहित नमुन्यात सादर करावा, अशा अटी घालण्यात आल्या असल्याची माहिती सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.









