कोरोनाच्या वेगाने झालेल्या प्रसारामुळे भारतीय लोकांना वेगवेगळय़ा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 15 ते 24 वयोगटातील मुलांमध्ये मोठय़ा प्रमाणावर उदासीनतेचा विकार कोरोनामुळे निर्माण झाला असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. प्रारंभीच्या काळात या विकाराची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तसेच त्याचा पत्ताही लागत नाही. तथापि, ही मुले मोठी झाल्यानंतर त्यांना त्यांच्या उदासीन आणि नकारात्मक मनोवृत्तीचा परिणाम भोगावा लागू शकतो, असा इशारा अनेक वैद्यकीय तज्ञांनी दिला आहे. भारत सरकारनेही या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून काही योजना सुरू केल्या असल्याचे सांगण्यात आले.
केवळ भारतातच नव्हे तर जगातील 21 देशांमध्ये किशोरवयीन मुलांना अशा तऱहेचा त्रास होत असल्याचे आढळून आले आहे. भारतात कोरोनाबाधित अल्पवयीन मुलांमध्ये हे प्रमाण 7ः1 असे आहे. म्हणजेच सात मुलांमागे एकाला या मानसिक आजाराने ग्रासले आहे. मानसिक आजारांसंदर्भात भारतात जनजागृती कमी असल्याने अशा विकारांवर वेळीच उपचार केले जात नाहीत. त्यामुळे नंतर ही उदासीनता मानसिक नकारात्मकतेत रूपांतरित होते आणि कित्येकदा या रुग्णांचे जीवनही उद्ध्वस्त होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर अशा स्थितीवर उपचार करणे आवश्यक असल्याचे तज्ञांनी आवर्जून सांगितले आहे.
कामामध्ये लक्ष न लागणे, रात्री झोप व्यवस्थित न येणे, विनाकारण भीती वाटणे, लक्ष एकाग्र करण्यात समस्या, चीडचीड होणे इत्यादी प्राथमिक लक्षणे मुलांमध्ये प्रथम दिसून येतात. याचवेळी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊन त्यांच्यावर उपचार केल्यास या विकारातून पूर्णपणे बाहेर येणे शक्मय आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे.









