प्रतिनिधी / मडगाव
सरकारी अधिकाऱयांची बदली झाली की, सर्व काही सुरळीत चाललेय, त्याचा कसा बटय़ाबोळ होतो याचा अनुभव सद्या मडगाव नगरपालिका तसेच हॉस्पिसियो इस्पितळाला देखील आलेला आहे. कोरोनामुळे एखाद्या बेवारशी व्यक्तीचा बळी गेला तर त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही उपजिल्हाधिकारी कार्यालय तसेच मडगाव पालिकेची. पण, त्यावर येणारा खर्च वेळीच मिळत नसल्याने मृतदेहाची परवड सुरू झालेली आहे.
मडगाव परिसरात दोन बेवारशी लोकांचा कोरोनामुळे बळी गेला. आणखीन नेमक्या याच वेळी सरकारी अधिकाऱयांच्या बदलीचा आदेश निघाला. त्यामुळे या मृतदेहाची परवड सुरू झाली. एक मृतदेह तर तब्बल अकरा दिवस शवागरात पडून राहिला. उपजिल्हाधिकारी कार्यालयातून या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक निधी मडगाव पालिकेकडे पोचलाच नाही. त्यामुळे मृतदेह शवागरातच पडून राहिले. शेवटी मडगाव पालिकेने दोन्ही मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी दहा हजार रूपये खर्च केले.
हे दहा हजार रूपये उपजिल्हाधिकारी कार्यालयातून, मडगाव पालिकेला परत फेड करावे अशा आशयाचे पत्र मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी सासष्टीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहे.









