कुस्तीला राज्य शासनाने विशेष पॅकेज द्यावे
प्रतिनिधी / सांगरूळ
कोरोनामुळे बंद असलेली महाराष्ट्रातील कुस्ती मैदाने सुरू करावीत आणि कुस्तीला राज्य शासनाने विशेष पॅकेज द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघातर्फे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर सकारात्मक प्रतिक्रिया देत लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी बोलून कुस्ती मैदाने अधिकृतरित्या सुरू करण्याबाबत पुढील कार्यवाही करू असे आश्वासन नामदार शिंदे यांनी कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.
पैलवान विकी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कुस्ती – मल्लविद्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी नगर विकास मंत्री नामदार एकनाथ नाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन महाराष्ट्रात पूर्वीप्रमाणे कुस्ती मैदानी रीतसर सुरू करावीत आणि कुस्तीला राज्य शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली. नामदार शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्राला कुस्ती या खेळाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. हजारो वर्षांची परंपरा असणाऱ्या कुस्तीने आजवर देशासाठी प्रत्येक कालखंडात आपले योगदान दिले. रामायण, महाभारत इथपासून ते छत्रपती श्रीशिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य उभारणीसाठी लढणारे सर्व मावळे सुद्धा पैलवान होते.देशाला वैयक्तिक क्रीडाप्रकारात ओलिम्पिक चे पहिले पदक सुद्धा महाराष्ट्राने स्व.खाशाबा जाधव यांच्या रूपाने दिले आहे.
महाराष्ट्रात सध्या कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेला लॉकडाऊन शिथिल होत आहे. आम्ही अशी मागणी करतो की यामध्ये गावोगावी असणाऱ्या कुस्तीचा सराव करणाऱ्या तालिमींचा समावेश करावा व गावोगावी होणारी यात्रेची मैदाने सुरू व्हावीत. महाराष्ट्राच्या कुस्तीक्षेत्रात करियर करणारे पैलवान हे गरीब परिस्थिती असणारे आहेत. खेडोपाडी होणाऱ्या कुस्त्या हेच त्यांच्या आर्थिक उत्पनांचे एकमेव साधन आहे .लॉकडाऊनमुळे अनेक मल्ल कुस्तीपासून दुरावत आहेत. मैदाने रद्द असल्याने खुरकासाठी पैसा मिळेनासा झाला आहे. हे क्षेत्र अत्यंत संकटात सापडले आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या सांस्कृतिक सधनतेचे प्रतीक असणारा आणि पुरुषार्थ मर्दुमकी जपणारा कुस्ती या खेळासाठी व मल्लांच्या खुरकासाठी विशेष पैकेज जाहीर करावे .कुस्ती क्षेत्राला सध्याच्या संकटातून सोडवावे अशी मागणी केली आहे .याबरोबरच गावोगावी असणाऱ्या आखाड्यात मल्लाना सराव सुरू करण्यास मुभा देण्यात यावी जेणे करुन या क्षेत्रात करियर करून देशासाठी पदके आणण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमद्या मल्लाना कुस्तीपासून वंचीत न राहता रोजचा सराव करणे सोपे होईल.
कुस्ती खेळून, सकस खुराक घेऊन महाराष्ट्रातील पैलवान कोरोनाशी अतिशय चांगल्या पद्धतीने लढतील अशी अपेक्षा आहे व यातूनच सशक्त महाराष्ट्र निर्माण होईल अशी अपेक्षा कुस्ती-मल्लविद्या महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.









