प्रतिनिधी / फोंडा
कोरोना महामारीचा खूप मोठा परिणाम गोव्याच्या सांस्कृतिक क्षेत्रावर झालेला असून, खास करून ‘भजन’ आणि ‘घुमट आरती वादन’ या दोन प्रादेशिक कलांच्या माध्यमातून वावरणाऱया हजारो कलाकारांच्या उत्साहावर विरजण पडल्याची भावना व्यक्त होत आहे. लोककला, ललित संगीत, सुगम संगीत, शास्त्रीयसंगीत अशा विविध कला प्रकारांच्या साधनेतून आनंद मिळविणारा गोमंतकीय कलाकार निराश झाल्याचे, या क्षेत्रावर दृष्टीक्षेप टाकल्यास जाणवते.
कला अकादमीची भजनी स्पर्धा अधांतरीच
राज्य पातळीवर आयोजित होणारी स्व. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती भजन स्पर्धा यावर्षी होऊ शकली नाही. दरवर्षी मे महिन्यात गोव्यातील विविध ठिकाणी कला अकादमीतर्फे पाच दिवशीय भजन कृतीसत्राची आयोजने व्हायची. त्यानंतर जून महिन्यापासून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत महिला, पुरुष आणि बाल कलाकारांच्या विभागीय भजनी स्पर्धांच्या फेऱया पूर्ण व्हायच्या. 15 ऑगस्ट रोजी भव्य पुरुष कलाकार स्पर्धा होत होती. यावर्षी ही स्पर्धा कोविड महामारीमुळे पार पडली नाही मात्र ती होईल अथवा नाही, याबद्दलची साशंकता गोव्यातील हजारो कलाकार तसेच कलाप्रेमींमध्ये आहे.
घुमट आरती कलाकारांमध्ये निरुत्साह
घुमट आरतीमध्ये मन रमविणारे शेकडो कलाकार आरती वादनाच्या संधीची वाट पाहताहेत. सावईवेरेच्या स्पर्धेपासून श्रावण महिन्याच्या पहिल्या गुरुवारी निंमत्रित पथकांची होणारी स्पर्धा यावर्षी कोविड महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे घुमटआरती वादन सादरीकरणाच्या मोसमालाही विलंब झालेला असून, परिस्थिती नियंत्रणात न आल्यास यावर्षी घुमट आरती स्पर्धेच्या आनंदास स्पर्धक कलाकार आणि रसिक मुकतील, अशीच विचित्र परिस्थिती आहे.
श्रावणमास कलाकारांसाठी निराशादायक
भजनी कलेवर स्वतःचा चरितार्थ चालविणारे कलाकार गोव्यातील विविध भागात व्यावसायिक कलाकार म्हणून आपली कला पेश करीत असत. श्रावणी सोमवार, मंगळवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या धार्मिक दिवसांखेरीज नागपंचमी, वास्को सप्ताह, चतुर्मासातील उत्सव, गोकुळाष्टमी अशा कार्यक्रमांमधून ते आपली कला पेश करायचे परंतु या चतुर्मासाची सुरुवातच या कलाकारांसाठी धक्कादायक ठरल्याचे मत भजनी कलाकारांकडून व्यक्त होत आहे.
व्यावसायिक नाटय़कलाकार संभ्रमित
कोकणी नाटकाचे प्रयोग करणारे व्यावसायिक कलाकार, ज्यामध्ये राजदीप नाईक, महेश नाईक, बाबा प्रसाद, किर्ती नर्से, गोपाळ भांगी असे कितीतरी नाटय़कर्मी नव्या नाटकाच्या नियोजनबद्ध प्रयोगासाठी प्रयत्नशील असायचे परंतु या मोसमासाठी नवीन नाटकाच्या निर्मितीसाठी किती वाव असेल, याबद्दल हे कलाकार साशंक आहेत.
संगीताचे वर्ग बंद
यावर्षी कोविड महामारीमुळे शासकीय संगीत महाविद्यालय, कला अकादमी, स्वामी विवेकानंद, राजीव कला मंदिर, रवींद्र भवन, कामाक्षी कलावर्धिनी अशा अनेक नामवंत संस्थांना वर्ग बंदच करावे लागले. यामुळे या क्षेत्रातील अध्यायिना तसेच गुरुंना मोठय़ा अडचणीला सामोरे जावे लागले. जुलै महिन्यात संपन्न होणारे गुरुपौर्णिमेचे उत्सवही बऱयाच प्रमाणात स्थगित ठेवण्यात आले तर काही ठिकाणचे गुरुपूजनाचे कार्यक्रम रद्द झाले.
सांस्कृतिक क्षेत्रावर कोविड महामारीचा भयानक प्रभाव जाणवत असून कलाकार वर्गालाही त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत असल्याचे मत कलाकारांनी व्यक्त केले आहे.
दूधावरची तहान ताकावर – श्रीकांत शिरोडकर
शिरोडा येथील ज्येष्ठ पखवाजवादक तसेच कामाक्षी कलावर्धिनीचे संगीत शिक्षक श्रीकांत शिरोडकर म्हणाले की, श्रावण महिना भजनी कलाकारांसाठी पर्वणीच असते मात्र यावर्षी कोविडमुळे काही मंदिरेही बंद आहेत. त्यामुळे भजन सादरीकरण आणि भजन श्रवण या दोन्ही गोष्टींना सच्चा भजनप्रेमी खऱया अर्थाने मुकला आहे. वास्को सप्ताहही यावर्षी कोविडच्या कचाटय़ात सापडल्याचे आपण आपल्या कलासंपन्न आयुष्यात प्रथमच पाहतो आहे. गोव्यातील कलाकारांनी संयम बाळगावा. सध्या घरीच रियाज करून दुधावरची तहान ताकावर भागवावी, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.
हेही दिवस जातील – गोकुळदास रासईकर रासई गावचे नामवंत हार्मोनियमवादक व संगीत शिक्षक गोकुळदास रासईकर म्हणाले की, या अडचणीच्या काळात कलाकारांनी आपल्या कला सादरीकरणासाठी नवनवीन वाटा शोधल्या पाहिजेत. यू-टय़ुबवरून आपली कला प्रसारीत करणाऱया निवडक गोमंतकीय कलाकारांची त्यांनी प्रशंसा केली. हेही दिवस जातील, कलाकारांनी आशावादी असावे, असे ते म्हणाले.