तातडीने समस्या सोडविण्याची उद्योजकांची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बोर्डने (केआयडीबी) उद्योजकांना केवळ आश्वासनांव्यतिरिक्त ठोस असे अद्याप तरी काहीच दिले नाही. केआयडीबीबद्दल चेंबर ऑफ कॉमर्स, स्मॉल स्केल इंडस्ट्रिजच्या पदाधिकाऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठकीत उद्योजक आपल्या तक्रारी मांडतात. त्यावेळी जिल्हाधिकारी संबंधित अधिकाऱयांना सूचना करत आहेत. मात्र, त्या सूचनांचे पालन ते अधिकारी करत नाहीत. केवळ वर्षातून चार वेळा बैठका घेतल्या जातात. मात्र, त्यामधून काहीच निष्पन्न होत नसल्याचे दिसून येत आहे.
उद्योजकांच्या मागण्यांच्या फायली अनेक वर्षांपासून केआयडीबी कार्यालयात पडून आहेत. त्याकडे या अधिकाऱयांनी कधीच गांभीर्याने लक्ष दिले नाही. केआयडीबीबरोबरच हेस्कॉमनेही उद्योजकांना सहकार्य केले नाही. यामुळे येथील उद्योकधंदे दिवसेंदिवस मंदीच्या छायेखाली जात आहेत. यातच कोरोना आल्यामुळे आणखीनच गंभीर समस्या बनली आहे. कोरोना काळात बैठकाही घेण्यात आल्या नाहीत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
एक खिडकी योजनेची बैठक किमान दोन महिन्यांतून एकदा घ्यावी, अशी मागणी उद्योजकांनी यापूर्वी केली आहे. मात्र, त्याबाबत जिल्हाधिकाऱयांनी अजूनही गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे उद्योजकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मंदीचा सामना करताना उद्योजकांची हेळसांड होत आहे. तेव्हा आता तरी जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.
प्रत्येक बैठकीत जिल्हाधिकारी अधिकाऱयांना सूचना करतात. मात्र, त्या सूचनांकडे केआयडीबी आणि हेस्कॉमचे अधिकारी गांभीर्याने कधीच लक्ष देत नसल्याचा आरोप उद्योजकांकडून प्रत्येक बैठकीत केला जातो. मात्र, याचे सोयरसुतक संबंधित अधिकाऱयांना नसल्याचे दिसून येत आहे. नवीन व्यवसाय करणाऱया उद्योजक केआयडीबीकडे अर्ज दाखल करतात. त्या अर्जांकडेही दुर्लक्ष होते. वास्तविक त्या अर्जांचा विचार करून केआयडीबीला जिल्हाधिकाऱयांनी उद्योग-व्यवसाय करणाऱयांना चालना द्यावी, अशी मागणी उद्योजकांतून होत आहे.
उद्यमबाग, होनगा त्यानंतर आता कित्तूर येथे इंडस्ट्रिजसाठी 648 एकर जागा घेतली आहे. त्या ठिकाणी रस्त्यांची समस्या आहे. वीज आणि पाण्याच्या जोडणीबाबत तक्रारी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन उद्योजक जाण्यास तयार नाहीत. तेव्हा त्याचा विकास व्हायचा असेल तर मूलभूत सुविधा प्रथम उपलब्ध कराव्यात. त्यामुळे उद्योजक तेथे व्यवसाय करण्यास पुढे येतील, असेही सांगण्यात येत आहे.
होनगा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये विविध समस्या भेडसावत आहेत. त्याबाबत अनेक वेळा उद्योजक तक्रारी करत आहेत. पावसाळय़ापूर्वी येथील समस्या सोडविणे गरजेचे असल्याचे मत उद्योजकांतून व्यक्त होत आहे.









