प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असून त्यामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात खेड, लांजा व दापोली तालुक्यीतल प्रत्येकी एका रूग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून जिल्हय़ातील कोरोना बळींची संख्या 45 झाली आहे. दरम्यान, मंगळवार सायंकाळपासून प्राप्त अहवालांमध्ये 45 नवे रूग्ण सापडले असून यात 3 डॉक्टर, पोलीस व कुटुंबीय, नर्स आदींचा समावेश आहे.
आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये दापोलीतील बुरोंडी येथील 60 वर्षीय रूग्णाचा समावेश आहे. या रूग्णावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दापोली तालुक्यातील कोरोनाचा हा 11 वा बळी ठरला आहे.
लांजा तालुक्यात माजळ येथील 56 वर्षीय रुग्णाचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला. लांजातील बाधीत डॉक्टरच्या संपर्कामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली होती. डायबेटीस असल्याने तीन दिवसांपुर्वी डायलेसीसही करण्यात आले होते. जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी त्यांचा मृत्यू झाला. लांजा तालुक्यातील हा दुसरा बळी आहे.
खेडमध्ये कोरोनाचा 5 वा बळी
खेड तालुक्यातील तालुक्यातील ऐनवली-वरचीवाडी येथील 58 वर्षीय प्रौढाचा जिल्हा रूग्णालयात 16 जुलै रोजी मृत्यू झाला होता. हा प्रौढ मुंबईतून येथे आल्यानंतर थेट रत्नागिरी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. याचठिकाणी स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना बळींची संख्या पाच झाली आहे. यापूर्वी अलसुरे, शिवतर, कुंभाड, फुरूस येथील व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
46 नवे रूग्ण
मंगळवार सायंकाळपासून पॉझीटीव्ह अहवाल आलेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालयातून नमुने घेतलेले 11, उपजिल्हा रुग्णालय कामथे 26, दापोली 4, गुहागर 1, घरडा येथील तिघांचा, तर खेडमधील व्यक्तीच्या मृत्यूपश्चात अहवालाचा समावेश आहे. नव्या रूग्णांमुळे जिल्हय़ातील बाधीतांची संख्या 1354 झाली आहे.
45 जण कोरोनामुक्त
बुधवारी 45 रुग्णांना बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 813 झाली आहे. बुधवारी डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय 4, संगमेश्वर 5, कामथे 1, समाजकल्याण 1, कोव्हीड केअर सेंटर घरडा 1, आणि कोव्हीड केअर सेंटर पेंढांबे येथील 33 जणांचा समावेश आहे.
543 अहवालांची प्रतीक्षा
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 14 हजार 892 नमुने तपासण्यात आले आहेत. त्यातील 1336 अहवाल पॉजिटीव्ह तर 13 हजार 1 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 543 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
जिल्हय़ात 2 लाखांहून अधिक व्यक्ती दाखल
परराज्यातून व अन्य जिह्यातून रत्नागिरी जिह्यात 21 जुलै पर्यंत 2 लाख 876 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 732 आहे. होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 17 हजार 148 इतकी आहे.









