प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र शासनाने प्लॅटिना या नावाने रक्तद्रव उपचाराबाबत संशोधन प्रकल्प 29 जून पासून सुरू केलेला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 14 वैद्यकिय महाविद्यालयांना सहभागी केलेले आहे. त्यामध्ये शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरजचा समावेश केला आहे. यामध्ये कोरोनामधून बरे झालेल्या रूग्णांचा प्लाझ्मा काढून घेऊन सध्या कोरोनाग्रस्त असलेल्या रूग्णांना दिला जातो. एका दात्याने दिलेला प्लाझ्मा दोन रूग्णांना उपयोगी पडतो. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांच्या प्लाझ्मा डोनेशनमुळे एखाद्या रूग्णाचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे जे रूग्ण बरे झाले आहेत त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढील निकष पूर्ण करावे लागतात. प्लाझ्मा दाता हा sympthomatic असावा लागतो (जसे की ताप, खोकला, श्वास लागणे इत्यादी). त्यांची टेस्ट निगेटीव्ह येऊन किंवा बरे होऊन किमान 28 दिवस पूर्ण व्हावे लागतात. त्यांचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान हवे. त्यांचा Hb 12.5 ग्रॅमपेक्षा जास्त हवा. त्यांना इतर कोणताही आजार असू नये. ते पॉझिटिव्ह आल्यापासून 4 महिन्यापर्यंतच प्लाझ्मा दान करू शकतात. हे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या दात्यांची रक्त चाचणी करून त्यांचया शरिरामध्ये प्रतिपिंडे तयार झालेली आहेत का नाही हे पाहिले जाते. तसेच त्यांच्या रक्तामधील प्रथनांचे प्रमाण आवश्यक तेवढे आहे का नाही हे तपासले जाते. त्याचप्रमाणे रक्तदान करण्यासाठी आवश्यक असलेले इतर निकष एचआयव्ही, कावीळ इत्यादी आजार नसणे हे पाहिले जाते.
सर्व निकषामधून पात्र होणाऱ्या दात्यांचे 400 ते 450 मिली प्लाझ्मा शासकिय वैद्यकिंय महाविद्यालय मिरज येथील रक्तपेढीमध्ये अत्याधुनिक मशिनव्दारे घेतले जाते व तो सुरक्षितरित्या जतन करून प्लॅटिनाच्या निकषानुसार पात्र असणाऱ्या कोरोनाग्रस्त रूग्णांना दिला जातो.
Previous Articleसांगली जिल्ह्यासाठी 74 व्हेंटिलेटर प्राप्त – जिल्हाधिकारी
Next Article ‘ऍक्ट ऑफ गॉड’ अर्थात देवाची करणी








