जिल्हा कोविड रुग्णालयाने अनुभवला सुखद अनुभव
प्रतिनिधी / सिंधुदुर्ग:
एकीकडे जिल्हा कोविड रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची बाब विशेष चर्चेत असताना गुरुवारी याच जिल्हा कोविड रुग्णालयात अतिशय चिंताजनक स्थितीत उपचारासाठी दाखल झालेल्या पुणे येथील राजन शिवप्रसाद आणि वेंगुर्ले येथील हॉटेल व्यावसायिक सेलेस्तिन फर्नांडिस या दोघा रुग्णांनी कोविडमधून सुखरुप बाहेर पडताच रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱयांप्रती कृतज्ञता व्यक्त करून आनंद व्यक्त केला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व कोविड विभागप्रमुख डॉ. शाम पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी जिल्हा रुग्णालयात सेवा देणाऱया यंत्रणेचे विशेष आभार मानले.
राजन शिवप्रसाद हे पुणे येथील केरळीयन गृहस्थ सांगेली-सावंतवाडी येथील भावाच्या घरी आले होते. सिंधुदुर्गात येताच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना तात्काळ सावंतवाडी कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे त्यांना चार दिवस ऑक्सिजन लावण्यात आला होता. मात्र या चार दिवसांच्या उपचारानंतरही त्यांची तब्येत खूप नाजूक बनल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर तब्बल आठ दिवस उपचार झाल्यानंतर त्यांची या आजारातून मुक्तता झाली. या उपचारादरम्यान पुरेशी यंत्रणा नसतानादेखील रुग्णालयातील डॉक्टर व परिचारिकांनी दिलेली खूप चांगली सेवा दिली. त्यामुळेच आपण या आजारावर मात करू शकलो, अशी प्रतिक्रिया राजन शिवप्रसाद यांनी व्यक्त केली. आजारातून बरे झाल्यानंतर त्यांनी आपले बंधू आणि सांगेली येथील प्रगतशिल शेतकरी राजन व्यंकटेश यांच्यामार्फत जिल्हा शल्यचिकित्सकांना आभाराचे विशेष पत्र हे दिलेच. त्याचबरोबर कोविड सेंटरवरील काऊंटरसाठी एक मॉनेटरही भेट म्हणून पाठवून दिला.
वेंगुर्ले-उभादांडा येथील हॉटेल व्यावसाईक सेलेस्तिन फर्नांडिस यांनाही गुरुवारी जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. सेलेस्तिन यांचे पूर्ण कुटुंबच या कोरोनाच्या विळख्यात सापडले होते. दुर्दैवाने यात सेलेस्तिन यांच्या वडिलांचे निधन झाले. तर सेलेस्तिन यांना सुरुवातीला वेंगुर्ले येथील एका खासगी रुग्णालयात, त्यानंतर शिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्बल दहा दिवस त्यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. त्यानंतर त्यांची तब्येत अधिकच नाजूक बनल्याने त्यांना तातडीने जिल्हा कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. तब्बल तेरा दिवस ते या जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार घेत होते. या उपचारादरम्यान योग्य पद्धतीने औषधोपचार, ऑक्सिजन आणि त्याचबरोबर मनोबल वाढविण्यासाठी डॉ. शाम पाटील यांनी त्यांना उत्तमप्रकारे समुपदेशन केल्यामुळे तब्येत अतिशय नाजूक झाली असतानादेखील सेलेस्तिन यांनी या आजारावर मात करण्यात यश मिळविले. या रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. गौरव घुर्ये तसेच कर्मचारी कार्मिस यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले. एका डोळय़ात वडिलांच्या जाण्याचे दु:ख असताना दुसऱया डोळय़ात या कोविड रुग्णालयात देण्यात आलेल्या सेवेबद्दलच्या कृतज्ञतेचे अश्रू होते. या हॉस्पिटलमधील सेवा देणाऱया डॉक्टर व कर्मचाऱयांना आपण कधीच विसरणार नाही. हा आपला पुनर्जन्म असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱयांना खाऊचे वाटप केले.
जिल्हा रुग्णालयातून कोविडवर मात करून घरी जाणाऱया या रुग्णांनी हॉस्पिटलप्रति व्यक्त केलेल्या भावना पाहून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी समाधान व्यक्त केले. प्रतिकुल परिस्थितीत सेवा देणाऱया, जीवापाड प्रयत्न करणाऱया डॉक्टर व कर्मचाऱयांना अशा प्रकारच्या भावनांमधून लढण्यासाठी, अधिक चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी हत्तीचे बळ मिळते, असे ते म्हणाले.









