ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांसाठी हरियाणा सरकार पोस्ट कोरोना केअर सेंटर ‘उमंग’ सुरु करणार आहे. याबाबत माहिती देताना आरोग्य मंत्री अनिल विज यांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट खूपच भयानक आहे. कारण अनेक जण कोरोनाच्या आजारातून बरे होत आहेत मात्र, तरी देखील त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

ही परिस्थिती लक्षात घेऊन हरियाणा सरकारने या परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या अंतर्गत हरियाणा सरकारने ‘उमंग’ पोस्ट केअर सेंटरची सुविधा सरकारी रुग्णालयासह सर्व मोठ्या रुग्णालयातही देऊ केली आहे.
अनिल विज म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रूग्णांना कोरोनामुक्त झाल्यानंतरही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकारकडून त्यांच्या देखभालीची व्यवस्था केली जात आहे. या उमंग सेंटरमध्ये डॉक्टरांसह फिजिओथेरपिस्ट आणि योगा टीचर देखील असतील. कोरोनामुक्त झाल्यावरही तणावाखाली असणाऱ्या रुग्णांना हे मदत करणार आहेत.









