अमेरिकेच्या संशोधकांचा महत्वाचा निष्कर्ष, विषाणूच्या टोकांवर आघात करणारी प्रतिजैविके ठरतात लाभदायक
कोरोनाचे विषाणू आपल्या शरीरात (मुख्यतः फुप्फुसांमध्ये) शिरले आणि तेथे त्यांनी ठाण मांडले की कोरोनाचा विकास जडतो हे प्रत्येकाला माहीत आहे. हे विषाणू शरीरात शिरल्याक्षणीच शरीर त्यांचा प्रतिकार सुरू करते. प्रतिकार करण्यासाठी शरीर प्रतिजैविके तयार करते. कोणत्या प्रकारची प्रतिजैविके आपल्या शरीरात अधिक प्रमाणात तयार होतात त्यावर कोरोना बरा होणार की नाही हे ठरते. जी प्रतिजैविके कोरोनाच्या टोकांवर आघात करतात तीच आपले संरक्षण करू शकतात, असे अमेरिकेतील संशोधकांना आढळून आले आहे. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठात हे संशोधन होत असून त्याची माहिती ‘सायन्स इम्युनॉलॉजी’ या लोकप्रिय नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
कोरोना विषाणू त्याच्या भाल्यासारख्या टोकांच्या साहाय्याने रक्तातील पेशींमध्ये घुसतो. एकदा घुसल्यावर तो पेशींचा ताबा घेतो आणि तेथे त्याचे पुनरूत्पादन झपाटय़ाने होते. नंतर हे प्रचंड संख्येने निर्माण झालेले विषाणू आणखी पेशींवर हल्ला करतात आणि रक्त विषाणूंनी व्यापले जाते. ही प्रक्रिया रोखली गेली नाही तर रूग्ण अधिकाधिक बाधित होत जातो आणि अखेरीस त्याचा मृत्यू होऊ शकतो.
तीन प्रकारची प्रतिजैविके
कोरोनाला अटकाव करण्यासाठी रक्तात आयजीजी, आयजीएम आणि आयजीए अशा तीन नावांनी ओळखली जाणारी प्रतिजैविके तयार होतात, असे संशोधनात आढळून आले आहे. ही तिन्ही प्रतिजैविके कोरोनाचा त्यांच्या त्यांच्या क्षमतेनुसार प्रतिकार करतात. तथापि, यापैकी जी प्रतिजैविके कोरोनाच्या पेशीत घुसणाऱया टोकांना बोथट करून निकामी करतात तीच आपल्याला वाचवू शकतात. या उलट जी प्रतिजैविके कोरोना विषाणूच्या इतर भागांवर हल्ले करतात ती या विषाणूला पेशींमध्ये शिरकाव करण्यापासून रोखू शकत नाहीत, असे दिसून आले आहे. याचाच अर्थ असा की सर्व प्रतिजैविकांमध्ये विषाणूला रोखण्याची क्षमता नसते.
कोरोनाच्या तीव्रतेचा संबंध
कोरोना सौम्य प्रमाणात असताना त्याच्या टोकांवर हल्ला करून ती निकामी करणाऱया प्रतिजैविकांचे प्रमाण जास्त असते. या स्थितीतच कोरोना बरा होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तथापि, रूग्णांमध्ये या प्रकारची प्रतिजैविके कमी प्रमाणात निर्माण झाली, तर कोरोनाची तीव्रता वाढत जाते आणि ही प्रतिजैविके अगदीच अपुरी ठरली तर रूग्ण दगावू शकतो, असे सांगण्यात आले.
आहे. ही प्रतिजैविके अपुरी पडली तर कोरोनाचा शिरकाव अधिकाधिक पेशींमध्ये होऊन शरीर खंगत जाते आणि रक्तातील प्राणवायूची पातळी कमी कमी होऊन मृत्यू येऊ शकतो.
असे केले प्रयोग : कोरोना विषाणू आणि त्याचा प्रतिजैविकांकडून होणारा प्रतिकार यासंबंधीचे प्रयोग 254 रूग्णांवर करण्यात आले. अनेक रूग्णांमध्ये कोरोनाच्या टोकांवर आघात करणारी प्रतिजैविके अधिक प्रमाणात आढळून आली. ते रूग्ण कालांतराने बरे झाले. मात्र ज्या रूग्णांमध्ये या प्रतिजैविकांची संख्या कमी होती, त्यांचा रोग कालांतराने वाढत गेला. मात्र यापैकीही काही रूग्ण बचावले. पण एकंदर 25 रूग्णांचा मृत्यू झाला. ज्याची रोगप्रतिकार शक्ती मुळात कमी आहे, असे रूग्ण कोरोनाला अधिक प्रमाणात बळी पडल्याचे दिसून आले.
संशोधन भविष्यासाठी उपयुक्त
या संशोधनातून कोरोनाची बरीच रहस्ये उघड झाली आहेत. तसेच शरीरात कोरोनाच्या टोकांवर हल्ला करणाऱया प्रतिजैविकांची संख्या कशी वाढवता येईल याचा विचार आता सुरू झाला आहे. तशी औषधे अगर पूरक आहार निर्माण करता आल्यास कोरोनाला रोखणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच या प्रकारची प्रतिजैविके निर्माण होतील अशा लसीही शोधल्या जात आहेत. एकंदर ही माहिती भविष्यकाळात कोरोना किंवा तत्सम विषाणूंची शिकार होणाऱया रूग्णांना वाचविण्यासाठी कराव्या लागणाऱया संशोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे.
नवे संशोधन दिशादर्शक
- कोणती प्रतिजैविके कोरोनाचा प्रतिकार करतात याची झाली माहिती
- या प्रतिजैविकांची संख्या पुरेशी असल्यास कोरोनापासून धोका नाही
- हे संशोधन भविष्यकाळात कोरोनाच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरणार
- कोरोनाचा पेशींमध्ये शिरकाव रोखणे हे प्रतिकारासाठी सर्वात महत्वाचे









