कोरोना विषाणू चीनच्या मांसबाजारातून फैलावला या अनुमानावर अद्याप अनेक लोक विश्वास ठेवू शकत नाहीत. विषाणूच्या फैलावाच्या कारणाचा शोध घेण्यासाठी अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी कंबर कसली आहे. विषाणूचा संसर्ग चिनी प्रयोगशाळेमधून प्राण्यांमध्ये झाला आणि त्यानंतर तो माणसांमध्ये फैलावल्याची माहिती गुप्तचरांनी ब्रिटनच्या सरकारला दिली आहे.
विषाणू वुहानच्या मांसबाजारातून माणसांमध्ये फैलावल्याचे सांगण्यात येत असले तरीही चिनी प्रयोगशाळेत गळती झाल्याचा युक्तिवाद नाकारता येत नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन समिती स्थापन केली आहे. या समितीच्या सदस्याने गुप्तचरांकडून यासंबंधी माहिती मिळाल्याचे नमूद केले आहे. विषाणू प्राण्यांमधून फैलावला हे खरे असले तरीही तो वुहानच्या प्रयोगशाळेतून बाहेर पडत माणसांमध्ये शिरल्याची बाब नाकारता येत असल्याचे सदस्याने म्हटले आहे.
मांसबाजाराला लागून प्रयोगशाळा
कोब्राच्या सिक्युरिटी सर्व्हिसने यासंबंधी विस्तृत तपशील दिला आहे. विषाणूच्या फैलावासंबंधी विश्वासार्ह पर्यायी विचार आहे. वुहानमध्येच प्रयोगशाळा असणे केवळ योगायोग असू शकत नाही. ही प्रयोगशाळा मांसबाजारापासून केवळ 10 मैल अंतरावर आहे.
सर्वप्रथम कर्मचाऱयांना लागण?
प्रयोगशाळेच्या कर्मचाऱयांमध्ये सर्वप्रथम लागण झाली आणि पुढील काळात स्थानिक लोकसंख्येत याचा संसर्ग पसरल्याचा युक्तिवाद करण्यात येत आहे. वुहान सेंटर फॉर डिसिज कंट्रोल देखील मांसबाजारापासून 3 मैल अंतरावर आहे. तेथे वटवाघळासारख्या प्राण्यांवर प्रयोग करण्यात आले आहेत. 2004 मध्ये चिनी प्रयोगशाळेत झालेल्या गळतीमुळेच जीवघेणा सार्स विषाणू फैलावला होता.









