नांदगाव येथील बैठकीत निर्णय
प्रतिनिधी / कणकवली:
‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नांदगाव येथील सरपंच, ग्रा. पं. सदस्य स्वयंसेवक व जागृत नागरिकांनी तातडीने निर्णय घेऊन मेडिकल व दूध वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. जो या निर्णयाने पालन करणार नाही, त्याला 2000 रुपये दंड करण्याचे ठरविण्यात आले. तसेच मास्कशिवाय फिरणाऱयांना 200 रुपये दंड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तळेरे, फोंडाघाट येथे स्थानिक रुग्ण मिळाल्यानंतर संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यामुळे इतर भागातून नागरिक नांदगाव येथे खरेदीसाठी येऊ लागल्याने मेडिकल व दूध वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून जो बंद काळात दुकान उघडेल त्याला दोन हजार रुपये दंडाची कारवाई केली जाईल, अशी दवंडी देण्यात आल्याने नांदगाव बाजारपेठ मेडिकल व दूध वगळता कडकडीत बंद आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱयांना 900 रुपयांचा दंड ग्रा. प. मार्फत वसूल करण्यात आला. यासंदर्भात घेतलेल्या बैठकीला सरपंच आफ्रोजा नावलेकर, स्वयंसेवक रविराज मोरजकर, ग्रा. पं. सदस्य अरुण बापार्डेकर, मजीद बटवाले, रज्जाक बटवाले, बाळा सातोसे, श्रीकांत नार्वेकर आदी उपस्थित होते.









