कायदा सेवा प्राधिकार-बार असोसिएशनचा पुढाकार
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी कर्नाटक राज्य कायदा व सेवा प्राधिकार आणि बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने शहरातून रॅली काढण्यात आली. मास्क लावा, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझरचा वापर करा, अशा घोषणा देत ही रॅली काढण्यात आली. यामध्ये वकिलांबरोबरच कायद्याचे शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
न्यायालयाच्या आवारात या रॅलीचे उद्घाटन मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश सी. एम. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. रॅलीसाठी दोन पथके नेमण्यात आली होती. न्यायालयापासून कॉलेज रोडमार्गे धर्मवीर संभाजी चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली त्यानंतर कचेरी रोडवरून न्यायालयाकडे एक रॅली आली तर दुसरी रॅली खडेबाजार परिसरातून फिरविण्यात आली.
यावेळी कोरोनापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाच्या दक्षतेबाबत जनजागृती करण्यात आली. या रॅलीमध्ये बार असोसिएशनचे अध्यक्ष डी. एम. पाटील, उपाध्यक्ष गजानन पाटील, कायदा सेवा प्राधिकारचे सेपेटरी न्यायाधीश विजय अर्स, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, महिला प्रतिनिधी सरिता श्रेयेकर, सदस्य कलमेश मायाण्णाचे, नितीन गंगाई यांच्यासह आरएल लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.









