नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले असून देशात रविवारी दिवसभरात एक लाखांहून जास्त नवीन रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात 478 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात पहिल्यांदाच एक लाखाहून अधिक नवे रुग्ण सापडल्यामुळे चिंतेचे ढग अधिकच गडद झाले आहेत. यापूर्वी मागील वषी 16 सप्टेंबर 2020 रोजी देशातील सर्वात जास्त म्हणजे 97 हजार 894 रुग्णांची भर पडली होती. दरम्यान, झपाटय़ाने वाढत असलेल्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन मंगळवारी सर्वाधिक रुग्णसंख्या आढळणाऱया 11 राज्यांमधील आरोग्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱयांशी व्हर्च्युअल पद्धतीने चर्चा करणार आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या वाढून आता 1 कोटी 25 लाख 89 हजार 67 एवढी झाली आहे. देशात सक्रिय रुग्णांची संख्याही वाढत असून ती आता 7 लाख 41 हजार 830 एवढी झाली आहे. रविवारी दिवसभरात 52 हजार 847 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर एकूण बऱया झालेल्या रुग्णांची संख्या आता 1 कोटी 16 लाख 82 हजार 136 झाली आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 65 हजार 101 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लसीकरणाचा वेग वाढला
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात कोरोना लसीकरणाचा वेग वाढला असून आतापर्यंत 7 कोटी 91 लाख 5 हजार 163 लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. रविवारी दिवसभरात 16 लाख 38 हजार 464 जणांनी लस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. देशव्यापी मोहिमेच्या तिसऱया टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वांना लस घेण्यास अनुमती मिळाल्यामुळे तसेच केंद्रांची संख्या वाढविल्यामुळे अधिकाधिक लाभार्थींना लस मिळत आहे.
जवळपास 25 कोटी नमुन्यांची तपासणी
जागतिक कोरोना संकटात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने रविवारी एका दिवसात एकूण 8 लाख 93 हजार 749 नमुन्यांची तपासणी केली. तसेच आतापर्यंत देशात एकूण 24 कोटी 90 लाख 19 हजार 657 चाचण्या घेण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सोमवारी दिली. चाचण्यांचा वेगही वाढविल्यामुळे आता एकंदर कोरोना संसर्ग नमुन्यांचा एकंदर आकडा 25 कोटींच्या जवळपास पोहोचला आहे.









