ऑनलाईन टीम / सातारा :
कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनापासून लपवून परस्पर दुसऱ्या गल्लीत रहायला जाणाऱ्या गोवे, ता. सातारा येथील 34 वर्षीय कोरोनाबाधितावर सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामविकास अधिकारी रमेश बबन ओव्हाळ (रा. म्हसवे, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवे गावात राहणाऱ्या 34 वर्षीय युवकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याने याची कल्पना ग्रामपंचायत प्रशासनाला न देता परस्पर 1 सप्टेंबरच्या मध्यरात्री दुसऱ्या गल्लीतील नातेवाईकाच्या घरी रहायला आला. तिथे त्याने स्वतःला आयसोलेट करून घेतले. मात्र, त्याच्या जोरजोरात खोकण्यामुळे शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर त्यांनी खात्री करून ग्रामपंचायत प्रशासनाला याची माहिती दिली.
ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी कोरोनाबाधित राहत असलेल्या घराजवळ जाऊन याबाबतची संबंधिताला विचारणा केली. त्यावेळी त्याने ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि मंडल अधिकारी कुलकर्णी यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर कुलकर्णी यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, गावातील कोरोनाची वाढती रूग्णसंख्या आणि कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा निष्काळजीपणा यामुळे नाईलाजास्तव ग्रामस्थांनी 10 दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.









