श्रीपेवाडी हालसिद्धनाथ यात्रेच्यानिमित्त भाकणूक
महेश शिंपुकडे/ निपाणी
कोरोना या महाभयंकर रोगाने संपूर्ण जगाला संकटात आणलं आहे. या रोगाचा विषाणू पसरविणाऱया देशाला संपूर्ण जगाचा शाप लागेल. चीन देश मोठय़ा संकटात सापडेल. भारत देशावर आक्रमण करेल, भारत देश स्फूर्तीनं लढल. असं असलं तरी कोरोनापेक्षा महाभयंकर रोग संपूर्ण जगभरात हाहाकार माजवल. शास्त्रज्ञ लोक हात टेकतील, जनता कालवून जाईल, तेव्हा जपून रहा, अशी हालसिद्धनाथांची भाकणूक कृष्णात डोणे महाराज-वाघापूर यांनी केली.
विजयादशमी दसऱयानंतरच्या द्वादशीला होणारी श्रीपेवाडी येथील हालसिद्धनाथांची यात्रा बुधवारी उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त पूजाविधी, अभिषेक, पालखी मिरवणूक, ढोलवादन, जागर, फटाक्यांची आतषबाजी, हत्यार खेळविणे आदी विविध कार्यक्रम पार पडले. यात्रा उत्सव साजरा करताना कोरोना संसर्गाचे भान लक्षात घेऊन कोठेही गर्दी होऊ दिली नाही. सामाजिक अंतर राखून विधीवत पूजाविधीला महत्त्व देण्यात आले. गुरुवारी पहाटे पहिल्या भाकणुकीचा मान असणारी हालसिद्धनाथांची भाकणूक कृष्णात डोणे महाराज यांनी कथन केली. यावेळी भाविक व महिला उपस्थित होत्या.
श्रीपेवाडी पवित्र भूमी
मेघयान मळा आकाशाच्या फळा, अमृताच्या धारा हाय बाळांनो मेघ उदंड, हाय हाय बाळांनो बांदा आड बांद, मेघाची कावड गैरहंगामी हाय, मेघाच्या पोटी आजारगा हाय, पिका-पाण्यावर पीक, पाऊस याचा कालमान बदलत जाईल. द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा आहे. त्याच्या मागं अंधार आणि पुढही अंधार हाय, कोल्हापूरचं राजघराण क्षत्रिय वंशाच हाय, पिंजऱयातला राघू भाषण करतोया, धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा, श्रीपेवाडी गावातील बसवान देवालय हालसिद्धनाथांची पवित्र भूमी राहील.
वैरणीसाठी चोऱया-माऱया होतील
खरीप पीक उदंड पिकल, जमिनीतील धान्य अधिक पिकल, तांबडी ऱहास मध्यम पिकल, काळं धान्य सफल होईल, पांढरं धान्य मध्यम पिकल, पिवळं फूल मध्यम पिकल आणि मोलानं विकल, गव्हाच्या पिकाचे नुकसान होईल. धान्य दारात वैरण कोपऱयात अशी स्थिती निर्माण होईल, वैरणीला सोन्याचा भाव येईल, वैरणीसाठी चोऱया-माऱया होतील.
बकऱयाचा भाव कोंबडय़ाला येईल
पुकाची मेंढी मोलाची होईल, मेंढीबाई पालखीतून मिरवल, बैलाचा भाव बकऱयाला येईल, बकऱयाचा भाव एक लाखाच्या घरात जाईल, बकऱयाचा भाव कोंबडय़ाला येईल, कोंबडं मनुष्याच्या पाठी लागल, धनगराचं बाळ अस्वलाला मेंढी म्हणून मिठी मारल. आहे ती भाजी-भाकरी सांभाळून खावा, मेंढीच्या मेंढकाला माझा आशीर्वाद हाय, मेंढीची सेवा करेल तो सुखी राहील, मेंढपाळास माझा आशीर्वाद हाय.
डॉक्टर हात टेकतील
घरातून गेलेला मनुष्य घरी परत येईल, अशी आशा धरू नकोसा. ठेचला मरण हाय, उशाची भाकरी उशाला राहील, बुद्धी जास्त आयुष्य कमी राहिल, कलियुगात मनुष्य अल्पायुष्य जगल, माझं माझं म्हणू नका, पाण्याचा बुडबुडा हाय, पाण्याचा कप विकत मिळल, पाण्यासाठी नंबर लागल, अठरातऱहेचे आजार मनुष्याला होतील, डॉक्टर लोक हात टेकतील.
दुधाचा भाव वाढत जाईल
रसयान भांडं उदंड पिकल अन् मोलानं विकल, रसाला धारण माणसाला मरण, उसाचा काऊस होईल, ऊस सडकवर पडल, मांडवाच्या दारी 4 हजार म्हणतील, 4 हजार म्हणता 3800 वर येईल, 3800 म्हणता 3400 वर येईल, चढलं-उतरलं, साखरेचा भाव तेजीमंदीत राहील, गुळाचा भाव तेजीत राहील, शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील, साखर सम्राटाची खुर्ची डळमळीत राहील, उसाच्या कांडय़ानं आणि दुधाच्या भांडय़ानं गोंधळ होईल, आंदोलने पेटतील, शेतकरी चिंतेत राहील, विचार करेल, दुधाचा भाव वाढत जाईल.
भ्रष्टाचाराला उधाण येईल
राजकारणात मोठा गोंधळ होईल, काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झंझावात लागेल, राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात उडय़ा मारतील, सत्ता, संपत्तीच्या मागे लागतील, कर्नाटक राज्यात उलथापालथ होईल, जातीच्या राजकारणाला ऊत येईल, मोठमोठे भ्रष्टाचार उघडकीस येतील, राजकीय नेते तुरुंगात जातील, सीमाभागाचं राजकारण ढवळून निघेल, गोंधळ होईल, निपाणी भागात मोठा दंगा होईल, अतिरेकी लोक येतील, घोटाळे करतील, बॉम्बस्फोट होतील, जगाच्या विनाशाला कारण ठरेल.
धर्माचा पाऊस, कर्माच पीक होईल
तरुणपिढी वाम मार्गाला लागेल, कलियुगात उगवत्या सूर्याला संकट पडलया, चंद्र व सूर्याची टक्कर लागल, तीन दिवस-तीन रात्र अंधार पडल, बापावाचून धडा नाही, गुरुवाचून विद्या नाही, एक रुपया गाडीच चक्र होईल, जगणं मुश्कील होईल, शेतीसाठी खून पडतील, पैशाच्या जोरावर न्याय मिळणार नाही, कागदाचा घोडा दात पाडल, काळी भांडी जतन करावी, चैत्राच्या महिन्यात गायी गंगेला जातील, समुद्रातील संपत्ती नाश पावेल, उन्हाळय़ाचा पावसाळा आणि पावसाळय़ाचा उन्हाळा होईल, धर्माचा पाऊस, कर्माच पीक होईल.
गर्वाचं घर खाली हाय
कर्नाटक राज्यात भ्रष्टाचाराला उधाण येईल, दिल्लीच्या गादीला धक्का बसल, देशाला नेतृत्त्वाचं कोडं पडल, नेतृत्त्व संकटात येईल, राजकीय वादाला ऊत येईल, जातीचं राजकारण चालल, राजकारणी मंडळी सत्तेचा बाजार मांडतील. कर्नाटक राज्यात सत्ताकारण डळमळीत राहील. गर्वाने वागू नये, गर्वाने वागशीला तर फसून जाशीला, गर्वाचे घर खाली हाय, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, भगवा झेंडा राज्य करेल, थराचा धोंडा थराला बसेल.
भारत-पाकिस्तान छुपे युद्ध होईल
रेल्वेचे अपघात होतील, दिवसाआड बातमी कानी येईल, चोऱया-दरोडय़ांना उधाण येईल, दागिने, पैसा घातक ठरेल, भारत-पाकिस्तान दरम्यान छुपे युद्ध होईल, चीन आक्रमण करेल, रक्ताचे पाठ वाहतील, अशी भाकणूक करताना हालसिद्धनाथांची सेवा करशीला तर खाशिला मेवा, करशिला चाकरी तर मिळेल भाकरी, मी मोठा तू मोठा असं म्हणू नका, असा उपदेश दिला.
पाऊस ताळतंत्र सोडल
पावसानं हाहाकार माजल, पाऊस ताळतंत्र सोडल, बघल तो भाग जलमय होईल, राज्याची मोठी हानी होईल, मोठी आंदोलने होतील. भूकंप होईल, कृष्णेच्या काठावर नऊ लाख बांगडय़ा फुटतील. विजेचे मोठे नुकसान होईल. जगातला पक्षी गावात येईल, नऊ कोसावर दिवा लागलं. 12 बाजार मोडून एक बाजार होईल. समुद्रातील संपत्ती नाश पावल, कर्नाटक राज्यातील धरणाला मोठं भगदाड पडल.









