ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेत कोरोनाचा फैलाव जगात सर्वाधिक झाला असून, मृतांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अमेरिकेसारखा बलाढय देशही कोरोनापुढे हतबल झाला असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा करून मदतीची विनंती केली आहे.
अमेरिकेत आतापर्यंत 3 लाख 11 हजार 357 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 8452 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणे आता कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत काल सायंकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोनवरून कोरोनाविरोधी लढ्यात मदत करण्याची विनंती केली आहे.
भारतात मलेरिया या रोगाशी लढण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वाईन हे औषध प्रभावी ठरले होते. हेच औषध सध्या कोरोनावर मात करण्यासाठी काही प्रमाणात प्रभावी ठरत असल्यामुळे, हायड्रोक्सीक्लोरोक्वाईनच्या मागणीत वाढ झालेली आहे. त्यामुळे भारताने या औषधाची निर्यात थांबवली आहे. मात्र, भारतात या औषधाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. मोदींनी या गोळ्या अमेरिकेत पाठविल्यास मी त्यांचा आभारी राहीन, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच मीही या गोळीचे सेवन करणार असून, माझ्या डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर मी ही गोळी घेईन, असेही त्यांनी सांगितले. मोदींनी ट्रम्प यांच्यासोबतच्या संवादाची माहिती दिली आहे.