कोरोना विषाणूने जगात हाहाकार माजवला आहे. मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. एखाद्या मोठय़ा युद्धात ज्या संख्येने मनुष्यहानी होते तितकी मनुष्यहानी आजपावेतो या भीषण विषाणूयुक्त आजाराने घडवून आणली आहे. जगातले सारे प्रदेश, विविध जाती, धर्म, वर्ण वंशांची माणसे कोरोनाग्रस्त बनत आहेत. लिंग भेद व आर्थिक भेदही या विषाणूच्या स्वाहाकारास अमान्य आहेत. यापूर्वी इबोला, सार्स, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लूच्या साथी येऊन गेल्या पण त्या मर्यादित ठेवणे व आटोक्मयात आणणे मानवास शक्मय झाले. कोरोना मात्र सध्यातरी यास बराच अपवाद ठरला आहे. यापूर्वी आपण असे पहात होतो की, जगातील कोणत्याही दोन देशात युद्ध झाले तर त्यातून किती हानी होईल, एखाद्या देशाने आण्विक वा रासायनिक शस्त्रांचा वापर केला तर त्याचा परिणाम किती भयावह होऊन मनुष्य व वित्तहानीचे प्रमाण किती असेल, आर्थिक युद्धातून व मंदीमुळे कोणती संकटे उद्भवतील, दहशतवादामुळे कोणते उत्पात घडतील, जागतिक तापमान वाढ व प्रदूषण यामुळे कोणती आपत्ती कोसळेल वगैरे वगैरे. अर्थात याचा विचार होणे हे निरर्थक होते असे नाही. या साऱया समस्या व धोके मानवी जीवनावर परिणाम करणारेच होते. मात्र एका बाजूने या साऱयाचा विचार होत असताना जगभरात वंशवाद, सीमावाद, धर्मवाद, आर्थिक स्पर्धा, राजकीय व सामरिक प्रभुत्व या विषयांवर संघर्ष सुरूच होते. शस्त्रास्त्र व्यापार व शस्त्रास्त्र स्पर्धा पराकोटीस पोहचली होती. ज्यांच्याकडे जीवघेण्या व प्रभावी शस्त्रास्त्रांची निर्मिती क्षमता अधिक त्या राष्ट्रांचा एक वेगळाच असा दरारा जगभरात प्रस्थापित झाला होता. अमूक देश आपल्या अर्थसंकल्पाचा अमूक इतका भाग शस्त्रास्त्रांवर खर्च करतो हे कौतुक मिश्रित आदराने सांगितले जात होते. लढाऊ विमाने, दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रs, विमानविरोधी क्षेपणास्त्रs, लढाऊ नौका, स्वयंचलित बंदुका, तोफा, रणगाडे, वाहने यांचा व्यापार कमालीचा गतिमान झाला होता. यामागे तर्कशास्त्र एकच भल्या-बुऱया कारणासाठी माणसे मारण्याची आणि भू-प्रदेशावर कब्जा मिळवण्याची आपली क्षमता दर्शवून प्रभुत्व निर्माण करणे. अशाही परिस्थितीत, पृथ्वीतलावर बुद्धिमान प्राणी गणल्या गेलेल्या, आदिम पशुत्वातून बाहेर येऊन सारासार विवेक, सभ्यता व संस्कृतीचे आदर्श सांगणाऱया माणसाने परस्पर संहारासाठी प्रचंड खर्च करून शस्त्रास्त्रे तयार करावीत की हाच खर्च मानव कल्याणासाठी करून आपले मनुष्यत्व उज्ज्वल व सार्थक करावे याचा विचार करून कल्याणकारी, शांततामय, समृद्ध सहजीवनाचे तत्त्व बुलंद करणाऱया व्यक्ती, संस्था, संघटना आपल्यापरीने कार्यरत होत्याच. पण विविध विषयांवर चाललेल्या जीवघेण्या जागतिक स्पर्धेत त्यांचा आवाज कमालीचा क्षीण होता. जग हे बळी तो कान पिळी या तत्त्वावर चालणार आणि ते तसेच स्वीकारले पाहिजे हे अलीकडच्या काळात माणसांनी, माणसांकडून गृहितच धरले होते. अशा पार्श्वभूमीवर कोरोना या एकपेशीय, साध्या नजरेसही न दिसणाऱया विषाणूने आपल्या संहारक उपद्रव क्षमतेने समस्त मानवजातीला, मानवी अस्तित्वाबाबतचा फेरविचार व फेरमांडणी करण्यास प्रवृत्त केले आहे. साऱया जगास आपल्या सामर्थ्याने व परस्पर स्पर्धेने वेठीस धरणाऱया अमेरिकेत 85,000 तर चीनमध्ये 81,000 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. इतर सारे उपद्व्याप स्थगित ठेवून या महामारीचा सामना करण्यात सद्या उभय देश मग्न आहेत. शस्त्रास्त्रे व इतर मानव संहारक बाबींवर अधिक खर्च की, अज्ञात, अगम्य अशा विषाणूजन्य आपत्तींपासून माणसास वाचवणाऱया आरोग्य, आहार, पर्यावरण, पोषण या महत्त्वपूर्ण गोष्टींना प्राधान्य असा पेच कोरोनाने जागतिक मंचावर फेकला आहे. यातून सद्बुद्धी लाभून जगातील सारे देश व मानव जमाती स्वतःस वाचविण्यासाठी काही विधायक पावले यापुढे उचलतील हीच सध्या सार्वत्रिक अपेक्षा आहे.
हा लेख लिहीपर्यंत कोरोनाग्रस्तांचा जगभरातील आकडा पाच लाख बत्तीस हजारापर्यंत पोहोचला आहे. चोवीस हजार मृत्यूमुखी पडले आहेत. सव्वा लाख लोक संसर्गातून बरेही झाले आहेत. सर्वत्र आरोग्य विषयक सूचना देण्यात आल्या आहेत. प्रतिबंधक उपाय योजनाही सुरू आहेत. परस्पर संपर्कातून फैलावणाऱया कोरोना महामारीस आळा घालण्यासाठी जागतिक बंद पाळण्यात येत आहे. जग थांबले आहे. एका विषाणूने ते थांबवले आहे. साऱयांनाच आता प्रतीक्षा आहे ती कोरोना प्रतिबधांत्मक रामबाण उपायांची, लसीची, औषधांची. जागतिक आरोग्य संघटना प्रसंगाचे गांभीर्य ओळखून या दिशेने कार्यरत झाली आहे. प्रतिबंधक लसच कोरोनाचे आक्रमण थोपवू शकते हे ओळखून औषध निर्मिती क्षेत्रातील 35 कंपन्या व संशोधन संस्थांनी या कार्यास वाहून घेतले आहे. यापैकी चार आस्थापनांनी प्राण्यांवर या लसीचे प्रयोग सुरू केले आहेत. यापैकी बोस्टनमधील बायोटेक फर्म ‘मॉडर्ना’ने प्राण्यांवरील प्रयोग संपवले आहेत आता लागलीच ती मानवावर प्रयोग करण्यास आरंभ करेल. चीनने या संदर्भात सध्याच्या कोव्हीड-19 आजारासाठी कारणीभूत असलेल्या सार्स-कोव्ही-2, विषाणूची जैविक माहिती व विकासक्रम याबाबतीत महत्त्वपूर्ण निष्कर्ष व निदाने पुरविल्यामुळे हे संशोधन गतिमान होण्यास मदत झाली आहे.
जानेवारीमध्येच चीनने या विषाणूची श्रेणी, क्रम परंपरा याविषयी माहिती देऊन संशोधन संस्थांना हा विषाणू वाढविणे आणि मानवी पेशींवर तो कशा पद्धतीने आक्रमण करतो व आजारी पाडवतो याचा अभ्यास करण्यास सहकार्य केले. यानंतर यापुढे कोरोना प्रतिबंधक लस जरी तयार झाली तरी तिला अनेक चाचण्यातून पुढे जाऊन आपली निर्विवाद उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. यानंतर लस उत्पादनावरील खर्च, लसीचा पुरवठा, लसींची गरज व संख्या हे विषय जागतिक रोग प्रतिबंधक उपक्रमाच्या आड येणारे राजकारण, अर्थकारण हे अडथळे दूर करून हाताळावे लागतील. या पार्श्वभूममीवर अशी परिणामकारक कोरोना प्रतिबंधक लस सर्वत्र उपलब्ध होण्यास किमान दहा महिने ते वर्षाचा कालावधी जाईल असे निरीक्षकांचे मत आहे. तोपर्यंत आरोग्य विषयक खबरदारी घेणे, सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करणे, शिस्त पाळणे इत्यादी उपायांवरच जनतेने भर द्यावयास हवा.
अनिल आजगावकर मोबा.9480275418








