बाधितांमध्ये डोकेदुखीचे प्रकरणे वाढली : एकटेपणाने नैराश्य अन् तणाव
कोरोना महामारी दोनप्रकारे मानवी मेंदूला नुकसान पोहोचवित असल्याचे आढळून आले आहे. पहिला म्हणजे हा बाधितांच्या मेंदूपर्यंत स्वतःचा प्रभाव सोडत असून त्यांच्यात डोकेदुखीची प्रकरणे समोर येत आहेत. दुसरे म्हणजे संक्रमणाला घाबरणाऱयांमध्ये तणाव आणि नैराश्याची प्रकरणे वाढत आहेत. देशात कोरोना महामारीनंतर 43 टक्के लोकसंख्या नैराश्याला सामोरी जात असल्याचे स्मार्ट हेल्थकेयर प्लॅटफॉर्म जीओक्यूआयआयच्या नव्या संशोधनात दिसून आले आहे. हे संशोधन 10 हजार भारतीयांवर करण्यात आले आहे.
कोरोना मेंदूसाठी किती धोकादायक आहे 4 मुद्दय़ांवरून समजून घेणे आवश्यक आहे.
1 नाकाद्वारे मेंदूपर्यंत पोहोचून कोरोना स्वतःची संख्या वाढवू शकतो आणि मेंदूतील प्राणवायूची पातळी कमी करू शकतो असे कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठाच्या संशोधनात नमूद आहे. श्वास घेण्याच्या क्षमतेवर नियंत्रण करणाऱया मेंदूच्या भागापर्यंत कोरोना नाकाद्वारे पोहोचू शकतो असे इंडियन इन्स्टीटय़ूट ऑफ केमिकल बायोलॉजी, कोलकात्याच्या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
2 अमेरिकेत मार्च महिन्यात कोरोनाचे चकित करणारे प्रकरण समोर आले. खोकला आणि तापाच्या लक्षणानंतर 74 वर्षीय व्यक्तीला रुग्णालयात आणले गेले. श्वास घेण्याचा त्रास प्रचंड वाढल्याने ते स्वतःचे नाव देखील सांगू शकत नव्हते. हात-पाय हलवितानाही त्रास होत होता. डॉक्टरांनी मेंदूची तपासणी केली असता त्यांना मस्तिष्काघात झाला होता.
3 अमेरिकेच्या मिशिगनमध्ये एअरलाइनमध्ये काम करणाऱया 50 वर्षीय महिलेला संसर्ग झाला. तिच्यात तीव्र डोकेदुखीचे लक्षण दिसून आले. डॉक्टरांशी बोलताना तिचा बोलण्याचा वेग हळूहळू कमी झाला. बेन स्कॅनिंग केले असता मेंदूच्या अनेक हिस्स्यांमध्ये सूज आल्याचे दिसून आले. डॉक्टरांनी याला ‘एक्यूट नेक्रोटायजिंग इनसेफेलोपॅथी’चे नाव दिले आहे. हेन्री फोर्ड हेल्थ सिस्टीमच्या न्यूरोलॉजिस्ट डॉ. एजिसा फोरे यांच्यानुसार संक्रमणानंतर काही दिवसांमध्ये मेंदूत सूज येत राहते. दुर्लभ स्थितीत कोरोना विषाणू मेंदूला भेदू शकतो.
4 संसर्गानंतर कोरोनाबाधितांमध्ये मेंदूशी संबंधित लक्षणे दिसून येत आहेत. यात बेन स्ट्रोक, इनसिफेलायटिसची लक्षणे, मेंदूत रक्ताच्या गुठळय़ा होणे, सुन्न होणे यासारखी स्थिती सामील असल्याचे इटलीच्या बेसिका विद्यापीठातील डॉ. एलेसेंड्रो पेडोवानी यांनी म्हटले आहे. काही प्रकरणांमध्ये कोरोनाबाधित ताप आणि श्वास घेण्यास त्रास यासारख्या लक्षणांपूर्वीच बेशुद्ध पडतो.
का वाढला तणाव अन् नैराश्य
कोरोना काळात नैराश्य आणि तणाव अनेक कारणांनी वाढला आहे. कुणाला संक्रमणाची भीती आहे तर कुणाची नोकरी गेली आहे. घरातील सदस्य पॉझिटिव्ह आल्यावर कुणी तणावात राहिला आहे. काही लोक दीर्घकाळापर्यंत घरात राहिल्यानेही तणाव आणि नैराश्याला तोंड देत आहेत. हा तणाव अद्याप पूर्णपणे मनातून बाहेर पडलेला नाही, असे मानसोपचारतज्ञ डॉ. अनामिका पापडीवाल यांनी म्हटले आहे.
मानसिक आजार कसा ओळखावा?
सदैव उदास राहणे, कामात मन न लागणे, भूक आणि तहान यांचे भान न राहणे आणि नेहमी नकारात्मक गोष्टी बोलणे ही मानसिक आजाराची लक्षणे असू शकतात. याचबरोबर प्रत्येक गोष्टीत त्रुटी शोधणे, अधिक वेळ झोपणे आणि एकाकी राहणे यासारखी लक्षणे असल्यास सतर्क व्हावे. कुटुंबीयांमध्ये ही लक्षणे दिसून आल्यास मानसोपचार तज्ञांची मदत घेतली जावी.
मानसिक आजार नीट करण्याचे उपाय
स्वकीयांशी बोलणे सोडू नका
कुटुंबीय, मित्र, सहकारी आणि नातेवाईकांशी अंतर राखू नका. कॉलिंग, मेसेजच्या मदतीने संपर्कात रहा. लोकांशी बोलताना मनात नकारात्मक विचार कमी येतात. तणाव आणि नैराश्याची बहुतांश प्रकरणे एकाकी वाटल्यामुळेच दिसून येतात.
स्वतःला व्यग्र ठेवा
मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याची उत्तम पद्धत म्हणजे स्वतःला आवडणाऱया कामांमध्ये व्यग्र करणे आहे. लिखाण, बागकाम, व्यायाम, नृत्य इत्यादी प्रकार केले जाऊ शकतात. घरात असताना स्वतःचे कौशल्य पडताळल्यास नकारात्मक विचार येणार नाहीत.
अपूर्ण कामे पूर्ण करा
कोरोनाकाळात हजारो लोक बेरोजगार झाले असून ते तणावाला तोंड देत आहेत. एक मार्ग बंद झाला असला तरीही सर्वकाही संपलेले नाही हे लक्षात ठेवावे. डोकं शांत ठेवून दुसरी नोकरी शोधावी. या काळात स्वतःची अर्धवट कामे पूर्ण करा. सद्यकाळात ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारेही कमाई केली जाऊ शकते. याचमुळे घरात असताना काही नवे सुरू करण्याचा प्रयत्न व्हावा.
संगीत ऐकावे
संगीत उदास मनात ऊर्जा निर्माण करण्याचे काम करते हे संशोधनातही सिद्ध झाले आहे. तणाव आणि नैराश्याला तोंड देत असताना मध्येमध्ये संगीत ऐकले जावे. संगीत स्वतःला आनंदी ठेवणाऱया हार्मोन्सस प्रसारित करण्याचे काम करते.
सर्वकाळ घरात बंद राहणे अयोग्य
कोरोनाकाळात पहिल्यांदाच लोक दीर्घकाळापर्यंत घरात राहिले आहेत. मास्क लावून सकाळी वॉकसाठी जाता येऊ शकते. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी घेतली जावी. सकाळचा वॉक मनात उत्साह आणण्याचे काम करेल.









