ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनामुळे अनाथ झालेली मुले आणि निराधार वृद्धांसाठी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. कोरोनामुळे ज्या मुलांनी आपल्या आई वडिलांना गमावले आहे, अशा अनाथ मुलांचे संगोपन आणि शिक्षणाचा खर्च दिल्ली सरकार करणार असल्याचे अरविंद केजरीवाल जाहीर केले आहे.
यासोबतच वृद्ध दाम्पत्यांचा खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे. वृद्ध दाम्पत्यांचा कमवता मुलगा गेल्याने आता घर चालवण्यासाठी कुणी नाही. अशा कुटुंबांची मदत देखील दिल्ली सरकार करणार आहे. ज्या मुलांनी आपल्या आई वडिलांना गमावले आहे. त्या मुलांनी चिंता करू नये. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असे केजरीवाल यांनी सांगितले आहे.
दरम्यान, दिल्लीत मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे, एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या 28 हजारांच्या पार पोहोचली होती. मात्र गेल्या 12 तासात कोरोनाबाधितांचा दर 12 टक्क्यांवर आला आहे. तर रुग्ण संख्या 3000 ने कमी झाल्याने रुग्णालयातील 3000 बेडही रिकामे आहेत. असे असले तरी नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन केजरीवाल यांनी यावेळी केले आहे.