वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
देशातील स्थिती बिकट असली तरीही लवकरच ती सुधारण्याची अपेक्षा देखील आहे. जगातील दोन सर्वात मोठय़ा पतमानांकन संस्थांनी भारतासाठी सोनेरी भविष्यवाणी केली आहे. 2020 मध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होण्यासह विकास दर वेगाने वाढू लागणार असल्याचे या दोन्ही संस्थांनी म्हटले आहे.
पुढील दोन वर्षांमध्ये म्हणजेच 2022 पर्यंत भारताचा विकासदर 8.5 ते 9.5 टक्क्यांवर पोहोचणार असल्याचे फिच आणि एसअँडपी या संस्थांनी नमूद केले आहे. या दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठय़ा पतमानांकन संस्था आहेत.
फिच आणि एसअँडपीच्या अनुमानात एक टक्क्याचे अंतर आहे. पुढील दोन वर्षांमध्ये भारताचा विकासदर 9.5 टक्के होईल, असा फिचचा अनुमान आहे. तर एसअँडपीने हा दर 8.5 टक्के राहणार असल्याचे सांगितले आहे. स्थिती सुधारण्याचा दर जलद करण्यासाठी भारताला वित्तीय क्षेत्र आणि श्रमबाजारात सुधारणांवर भर द्यावा लागणार असल्याचे या संस्थांनी म्हटले आहे.
चालू वर्षात घटणार
फिच रेटिंग्सने 2022 आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारणार असल्याचा अनुमान व्यक्त केला आहे. चालू आर्थिक वर्षात कोरोना महामारीमुळे झालेल्या घसरणीनंतर भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुनरागमन करणार आहे. पुढील आर्थिक वर्षात 9.5 टक्के विकासदर राहणार आहे. परंतु वेगवान विकासासाठी वित्तीय क्षेत्रात सुधारणा घडवून आणाव्या लागतील. चालू आर्थिक वर्षात जीडीपी 5 टक्क्यांनी घटणार असल्याचा अनुमान फिचने वर्तविला आहे.
पतमानांकनात बदल नाही
भारताच्या पतमानांकनात ‘बीबीबी’मध्ये संस्थेने कुठलाच बदल केलेला नाही. भारताचा विदेशी चलन भांडार आणि स्थानिक चलनावरील दीर्घकालीन मानांकन ‘बीबीबी’ तर अल्पकाळासाठी ‘ए-3’ असल्याची पुष्टी संस्थेने दिली आहे. कोविड-19 महामारीवर नियंत्रण आल्यावर भारताची अर्थव्यवस्था वृद्धिंगत होईल आणि देश स्वतःची मजबूत स्थिती कायम राखणार असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.









