प्रतिकूल परिस्थिती आणि संकटाशिवाय धैर्य प्राप्त होत नाही, हे वास्तव आहे. गेले 7-8 महिने आपण अशा परिस्थितीतून वाटचाल करत आहोत. सीमेवरील तणाव, डबघाईला आलेली अर्थव्यवस्था याबरोबरच कोरोनासारख्या महाभयंकर संकटाशी आपण लढत आहोत. शत्रू चिवट आहे म्हणून त्याच्याशी प्रत्यक्ष न लढता त्याचे दमन करण्यासाठी सुरुवातीची लढाई बंद दाराआड घरातूनच करावी लागली. परंतु हे युद्धतंत्र कायमस्वरुपी परवडणारे नव्हते. कारण याची फार मोठी किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेने मोजली. म्हणूनच टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरु करावी लागली. उद्योग, व्यवसाय, रोजगार आणि एकूणच अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तर भारत यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर पडले आहे हे मान्य करावे लागेल. तथापि, या महासाथीशी कडवी झुंज दिल्यानंतर भारतीय जनमानसाला पुढील आव्हांनाशी लढण्यासाठी धैर्याचे नवे बळ प्राप्त झाले हेही नाकारता येणार नाही. कोरोनाला आपण पूर्ण हरवलेले नाही. परंतु त्याचे आक्रमण रोखण्यात व त्याला थोडे मागे रेटण्यात आपण निश्चितच यशस्वी झालो आहोत. आता याच पार्श्वभूमीवर नवचैतन्य व नवा उत्साह संचारित करणाऱया दिवाळी सणाचे आगमन झाले आहे. दीपावली या सणास आपल्याकडे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. याच काळात शेतात पीक तयार झालेले असते. सर्वत्र सुखसमृद्धीचे वातावरण असते. सुखसमाधानाच्या जोडीने एका नव्या जीवनाला प्रारंभ होत असतो. महामारीच्या या भयानक अनुभवानंतर एका नव्या चांगल्या जीवनाच्या प्रारंभाचे संकेत दिवाळीच्या निमित्ताने निश्चितच मिळत आहेत. नव्या जगण्याला सुरुवात झाली. गेले 7-8 महिने कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले. बलाढय़ अर्थव्यवस्था असणाऱया देशांनाही त्याने जेरीस आणले. त्याप्रमाणे भारतीय अर्थव्यवस्थेवरही या विषाणूने अक्षरश: वरवंटा फिरवला. आर्थिक मंदीचा सामना यापूर्वी अनेकदा केला आहे. एखादा विषाणू मानवी शरीर पोखरतो, त्याची प्रतिकारशक्ती क्षीण करुन त्याला उद्ध्वस्त करतो, त्याच्यावर काळाचा घाला घालतो. परंतु हाच विषाणू संपूर्ण अर्थव्यवस्था पोखरुन ती रसातळाला कशी नेऊन टाकतो, एखाद्या देशाला कसे उद्ध्वस्त करु शकतो, यासाठी कोरोनाकडे पहावे लागेल. लॉकडाऊनच्या काळात सर्व उद्योगधंदे, व्यवसाय, दळणवळण, रोजगार ठप्प झाल्यामुळे अर्थव्यवस्था डबघाईला गेली. फार मोठय़ा ऐतिहासिक मंदीशी आपल्याला सामना करावा लागला. अर्थव्यवस्थेचे रुतलेले चाक बाहेर काढण्यासाठी 2-3 वर्षांचा काळ जावा लागेल, असे तज्ञ सांगतात. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार विविध पॅकेजची घोषणा करत आहे. अर्थव्यवस्थेला मजबुती आणण्यासाठी याचा निश्चित उपयोग होईल. बाजारपेठेतील हालचाल वाढल्यामुळे व आवश्यक उपाययोजना केल्यामुळे अर्थव्यवस्था हळूहळू सावरत असल्याचे दिसत आहे. या तिमाहीत ती आणखी सुधारेल असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. अनेकवेळा मोठी आव्हाने येतात, जसे कोरोनाचे आले. वास्तविक ती आव्हाने आपल्याला कमकुवत करण्यासाठी नसतात तर आपल्यातील सुप्तशक्ती किंवा ऊर्जा बाहेर काढण्यासाठी असतात, अशा सकारात्मक दृष्टीने कोरोना संकटाकडे पाहिले पाहिजे. एखाद्या संकटाच्या कचाटय़ात सापडल्यानंतर नैराश्य येऊ शकते. आपले नियोजन कोलमडू शकते पण ती परिस्थिती आपण स्वीकारायला हवी. या सर्व काळात दुर्दम्य आशावाद सोडला नसल्यामुळेच अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाने आर्थिक घोडदौडीला खीळ घातली असली तरी 2024 पर्यंत अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत नेण्याचे लक्ष्य असल्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले आहे. अत्यंत दुर्दम्य आशावादातूनच त्यांचे हे वक्तव्य आहे. कोरोनावर मात करण्यात आपण यशस्वी होत असू तर यापुढे यापेक्षाही मोठय़ा आव्हानाला आपण सामोरे जाऊ शकतो असा आत्मविश्वास कोरोना अनुभवातून निर्माण झाला आहे, हे नाकारता येणार नाही. एकीकडे कोरोना नियंत्रित करण्यात आपण यशस्वी झालो असलो तरी हे संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही याचे भान प्रत्येकाला असायला हवे. याचा प्रभाव कमी झाल्याचे वृत्त आहे, त्याचप्रमाणे काही देशांमध्ये याची दुसरी लाट आल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी आपणालाही सावध रहावे लागेल. कारण अद्यापही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात आलेली नाही. कोरोना विषाणूचा फैलाव रोखणारे एखादे औषध अथवा लसीकडे साऱया जगाचे लक्ष लागून राहिले आहे. लस संशोधनासाठी जगभरातील विविध कंपन्या, त्यांचे संशोधक अहोरात्र झटत आहेत. लससंशोधन ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यामुळे त्याची काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. अशा परिस्थितीत देशातील सर्वात मोठा सण आपण साजरा करत आहोत. तो कसा साजरा करावा याचे आव्हान आपल्यासमोर आहे. दिवाळी म्हटली की फटाके आले, फराळ आला. वाढत्या प्रदूषणाचा गंभीर विचार करुन कित्येक राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी फटाक्यावर बंदी घातली आहे, हे योग्यच झाले. हवेच्या प्रदूषणामुळे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे आहे. विशेषत: लहान मुले, वृद्ध याची शिकार होऊ शकतात, याचे भान ठेवायला हवे. दिवाळीच्या निमित्ताने फराळाच्या विविध पदार्थांची प्रचंड रेलचेल असते. पण खाण्यापिण्यावर संयम हवा. प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या तक्रारी हे दोन मुद्दे कोरोनासाठी चांगली पार्श्वभूमी तयार करु शकतात हे ध्यानात घ्यायला हवे. मागील 7-8 महिन्यात अनेक सण, उत्सव पार पडले. त्यावेळी नागरिकांनी जो संयम दाखवला तो दिवाळीतही दिसायला हवा. वास्तविक आपल्या सर्वच सणांची कृषी संस्कृतीशी जशी नाळ जोडली आहे, त्याचप्रमाणे ते पर्यावरणाला महत्त्व देणारे आहेत. कोरोनाचा अंधार सरुन नव्या आशाआकांक्षेची, भरभराटीची नवी पहाट उदयास येत आहे. त्यामुळे कोरोना अटकावाची सर्व पथ्ये पाळून दीपावलीस सामोरे जाऊ, अशी आशा आहे. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
Previous Articleविश्वव्यापी दीपोत्सव
Next Article ज्येष्ठ पत्रकार रवी बेळगेरे यांचे निधन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








