देशभरात 1.16 लाख रुग्ण – केंद्राने 9 राज्यांमध्ये पाठविली पथके
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डेंग्यूच्या प्रकोपाला रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपाययोजनांसह तांत्रिक मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तज्ञांची पथके पाठविली आहेत. हरियाणा, पंजाब, केरळ, राजस्थान, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा संख्येत सापडू लागल्याने हे पाऊल उचलण्यात आले आहे. देशात डेंग्यूचे चालू वर्षी आतापर्यंत 1,16,991 रुग्ण मिळाले आहेत.
तज्ञांच्या पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनडीसीसी) आणि मच्छरनिर्मिती रोग नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी सामील आहेत. 9 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सेवांचे महासंचालक आणि प्रमुख सचिवांना (आरोग्य) पत्र पाठविण्यात आले आहे. सक्षम प्राधिकाऱयाकडून डेंग्यूच्या प्रकोपाला रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांसह तांत्रिक मार्गदर्शन करून राज्य सरकारांच्या मदतीसाठी केंद्रीय पथकांना तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यात म्हटले आहे.
आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी केंद्रीय आरोग्य सचिवांना डेंग्यूचे अधिक रुग्ण असलेल्या राज्यांची ओळख पटविण्यास आणि तज्ञांचे पथक पाठविण्याचा निर्देश दिले होते. आरोग्यमंत्र्यांनी आजारावर नियंत्रणासाठी दिल्लीत डेंग्यूच्या स्थितीचा आढावा घेतला होता.
दिल्लीतच 1,530 रुग्ण सापडले असून यातील 1200 रुग्ण ऑक्टोबर महिन्यात मिळाले आहेत. मागील 4 वर्षांमध्ये हा आकडा सर्वाधिक ठरला आहे. यापूर्वी 2017 मध्ये दिल्लीत ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे 2022 रुग्ण सापडले होते. दिल्लीत सोमवारी डेंग्यूमुळे 5 जणांचा मृत्यू झाला. डेंग्यूसोबत चिकुनगुनिया-मलेरियाचे रुग्ण देखील वाढत आहेत. आतापर्यंत दिल्लीत मलेरियाचे 160 तर चिकनगुनियाचे 81 रुग्ण सापडले आहेत.









