कागल कोविड केअर सेंटर मधील वैद्यकीय सोयीसुविधांबद्दल मुरतुले कुटुंबीयांनी केला सत्कार
कागल / प्रतिनिधी
कोरोनावर यशस्वीरीत्या मात केलेल्या कागल येथील एका कुटुंबाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. येथील मुख्य बाजारपेठेतील मुरतुले कुटुंबातील ८० वर्षाच्या आजीसह संपूर्ण कुटुंबच बाधित झाले होते. या सर्वांवर कागल येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार झाल्यानंतर ते सुखरुप घरी परतले आहेत. कागल कोविड केअर सेंटर मधील वैद्यकीय व इतर सोयीसुविधाबद्दल मुरतुले कुटुंबीयांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा सत्कार केला.
कागल शहरातील मुख्य बाजारपेठ येथील एका कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. खबरदारी घेत तातडीने प्रशासनाने त्यांना कागल केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल केले होते. आज या कुटुंबातील ८० वर्षीय आजीबाईसह कुटुंबातील सर्व सदस्यांनी कोरोनावर मात करत घरी सुखरूप पोहोचले. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी वेळोवेळी केलेली खबरदारीची मदत व कागल केअर सेंटरला दिलेली चांगली व्यवस्था याबद्दल नामदार हसन मुश्रीफ यांचा आज मुरतुले परिवाराने घरी बोलावून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोरोनाग्रस्त रुग्ण आज बरे झाले. या रुग्णांनी कोरोनावर मात करून हा आजार बरा होऊ शकतो, हे दाखवून दिले. यामध्ये कागल शहरातील श्रीमती महानंदा गजानन मुरतुले ८० वर्षीय आजीबाईंचा समावेश आहे. वेळीच खबरदारी घेतल्याने कोरोनावर आपण सर्वजण मात करू शकतो,असे ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष नवीद मुश्रीफ, कागल नगरपरिषद पक्षप्रतोद नगरसेवक नितीन दिंडे, नगरसेवक आनंद पसारे आदी मान्यवर उपस्थित होते.








