राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे.
एकीकडे दु:खदायक व भीतीदायक वातावरण असताना ‘गोंयकार’ मात्र आता कोरोनाची धास्ती बाळगताना दिसत नाही. त्यात भर म्हणून सध्या जिवाचा गोवा करण्यासाठी देशी पर्यटकांनी समुद्रकिनारे व हॉटेल्स फुललेली आहेत. या पर्यटकांपासूनही आता गोंयकारांना कोरोनाची भीती आहे. कोरोनाचे कुठलेही नियम न पाळता गोव्यात बिनधास्तपणे पर्यटक तसेच स्थानिक नागरिक हिंडताना दिसतात. त्यामुळे आगामी काळात आरोग्याच्यादृष्टीने गोव्यापुढे नेमके काय वाढून ठेवले आहे याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसऱया बाजूने गोव्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, गोवा हे पर्यटन राज्य आहे. इथे देश-विदेशातून येणाऱया पर्यटकांचा मान राखणार आहोत त्याचबरोबर आमच्या नव्या नियमानुसार येणाऱया प्रत्येक पर्यटकांची तपासणी होईल. शिवाय त्यांना सक्तीने मास्क वापरणे सोमवारपासून बंधनकारक केले आहे. मास्क न वापरणाऱयांना किमान दंड रु. 100 वरून रु. 200 केला आहे.’ त्यानुसार गोवा पोलिसांनी कारवाई सुरू केली असल्याने ती समाधानकारक बाब आहे. राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी याची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे.
कोविड संकटात गेले आठ महिने गोंयकारांचे शिमगोत्सव, गुढीपाडवा, श्रावण मासातील उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा उत्साहाविना पार पडले. कुठेही फारशी लगबग दिसली नाही. आता मात्र दिवाळीनंतर काहीसे चित्र पालटताना दिसले. गोव्यातील बाजारपेठांमध्ये दिवाळीनंतर आता वर्दळ पहायला मिळते. गोवा सरकारने महसुलापोटी कॅसिनोला मान्यता दिल्याने सध्या पणजी राजधानीतही पर्यटकांची वर्दळ वाढली आहे तसेच वाहतूक कोंडीही अनुभवास येते. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असतानाच या कॅसिनोमधून कोरोनाबाधित सापडण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे राजधानीत सध्या भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. कॅसिनो जुगार संस्कृती सुरू केल्यामुळे नाराजीचा सूरही व्यक्त होत आहे.
कोरोना महामारीने संपूर्ण जग ग्रासलेले आहे. यावर मात करण्यासाठी आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य, मोठय़ा जबाबदाऱया पार पाडत आहेत. देशातील टाळेबंदी संपली असली तरी कोरोना विषाणू कायमचा संपलेला नसल्याने नागरिकांनी आरोग्याची स्वत:हून काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहे.
कोविड महामारीमुळे गोव्यातील अनेक उत्सव, कार्यक्रमांना ‘बेक’ लागला आहे. संपूर्ण गोव्यात तसेच शेजारील कर्नाटक व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला मडगावच्या श्रीहरि मंदिर देवस्थानच्या दिंडी महोत्सवातील सर्व प्रमुख कार्यक्रम कोरोना महामारीच्या संकटामुळे रद्द करण्यात आले असून देवस्थानात केवळ धार्मिक विधी होणार आहेत. शनिवार दि. 28 नोव्हेंबर हा दिंडी उत्सवाचा मुख्य दिवस होता. मात्र यंदा नामवंत गायक कलाकारांच्या मैफली तसेच श्रींची पालखी मिरवणूक रद्द करण्यात आलेली आहे. पेडणे तालुक्यातील मांद्रे गावातील श्री भगवती सप्तेश्वर मंदिरातील सप्ताहात नामवंत गायकांच्या संगीत मैफली होत होत्या. त्यातही यंदा खंड पडला आहे. येथेही कार्यक्रम मर्यादित स्वरुपात झाला. यामुळे रसिकांच्या आनंदावर एकप्रकारे विरजण पडलेले आहे. कला व संस्कृती संचालनालय व पर्यटन खात्याच्या सहकार्याने सांखळी येथे वाळवंटी नदीकिनारी सरकारी पातळीवर होणारा वार्षिक त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवही रद्द करण्यात आला आहे. मात्र मंदिरातर्फे होणारा धार्मिक व पारंपरिक सोहळा चालूच राहणार आहे. काणकोणच्या सर्व देवस्थानातील धार्मिक उत्सव रद्द करण्यात आले आहेत. पैंगीण येथील सुप्रसिद्ध कार्तिकी पौर्णिमेचा उत्सवदेखील यंदा रद्द करण्यात आला आहे.
गोव्यात पुढील आठवडय़ात देवस्थानचे होणारे दिवजोत्सव, जत्रोत्सव मर्यादित स्वरुपात होणार असून जत्रेनिमित्त होणाऱया फेऱयाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या आहेत. जत्रोत्सवाच्या निमित्ताने अनेक गोमंतकीय व बिगर गोमंतकीय आपला व्यवसाय थाटायचे. जत्रोत्सव हा त्यांच्यासाठी रोजीरोटीचा व्यवसाय ठरायचा. गोव्यातील काही जत्रोत्सवात फेरी अनेक दिवस चालायची. जत्रोत्सव खऱया अर्थाने अनेकांचे रोजगाराचे साधन बनले होते. अनेक कुटुंबीय जत्रेच्या फेरीत व्यवसाय चालवून आपला उदरनिर्वाह चालवायची, मात्र यंदा या रोजीरोटीला मुकणार असल्याचे चित्र आहे.
देवस्थानातील उत्सव मर्यादित स्वरुपात होत असल्याने कुठेतरी शान हरवल्यागत दिसत आहे कोरोना महामारीचे संकट दूर होऊन गोव्यातील हरवलेले सांस्कृतिक वैभव पूर्वपदावर येण्याच्यादृष्टीने येथील रसिकवर्ग, भाविकवर्ग प्रतीक्षेत आहे. एकीकडे रसिकांच्या, भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे तर दुसरीकडे कोरोनाबाधित व बळींची संख्या वाढतच असल्याने तसेच अनेक देशी पर्यटकांचा गोवा राज्यात वावर वाढल्याने गोवा सध्या असुरक्षित झालेले आहे. त्यामुळे ‘आपली सुरक्षा आपल्या हाती’ या धर्तीवर गोमंतकियांनी सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सावधगिरीने वाटचाल करणे अगत्याचे ठरते.








