मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन, होम आयसोलेशन किट योजनेचा आरंभ
प्रतिनिधी/ पणजी
कोरोनासंबंधी मृत्यू आणि आकडेवारीच्या बातम्या प्रसिद्ध करतानाच अनेक सकारात्मक गोष्टी घडतात. त्यांचेही वृत्तांकन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कोविड ट्रिटमेंट होम आयझोलेशन किट जनतेच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर आरोग्य सचिव अमित सतीजा, डीन डॉ. शिवानंद बांदेकर, एफडीए संचालक ज्योती सरदेसाई, आदी मान्यवर उपस्थित होते.
8 महिन्यांच्या मुलाच्या मृत्यूचे वृत्त सर्वांनी ठळकपणे प्रसिद्ध केले. परंतु त्याचबरोबर मडगावात कोरोना इस्पितळात आतापर्यंत 150 पेक्षा जास्त मुलांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या मातांना कोरोना होता, परंतु मुलांना त्याची लागण झाली नाही. आज ते सर्व सुखरूप आहेत. तसेच मुत्रपिंडाशी संबंधित गंभीर आजार असतानाच कोरोनाचीही लागण झालेले काही रुग्णही बरे झालेले आहेत. यासारख्या सकारात्मक बातम्या प्रसिद्ध कराव्या असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोव्यात सध्या कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या अन्य राज्यांच्या तुलनेत कित्येक पटीनी जास्त आहे. सध्या 4716 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यातील गोमेकॉ, ईएसआय यासारख्या मुख्य इस्पितळात उपचार घेणारे रुग्ण वगळता 600 कोविड केंद्रात आहेत तर 3500 होम आयझोलेशनमध्ये आहेत. त्या सर्वांना हे किट वितरित करण्यात येणार आहेत. या किटच्या वितरणामुळे रुग्ण अधिक चांगल्या प्रकारे आपल्या आरोग्याची काळजी घेतील, त्यामुळे मृत्यूदर तर कमी होईलच, सर्वात मोठा फायदा म्हणजे रुग्णांच्या उपचारांवर जो लाखो रुपये खर्च होत होता तोही बऱयाच प्रमाणात कमी होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना उपचार आता दिनदयाळ अंतर्गत आणण्यात आले आहेत. कोरोना उपचारांसाठी खाजगी इस्पितळांना दर निश्चित करून देण्यात आलेले असले तरीही अनेक खाजगी इस्पितळे अव्वाच्या सव्वा पैसे आकारत असल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता, सध्यातरी आपणापर्यंत एकही तक्रार आलेली नाही, तशी तक्रार आल्यास निश्चित कारवाई करणार असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोमेकॉत अत्याधुनिक सुविधा असतानाही आमदार, मंत्री खाजगी इस्पितळे वापरत आहेत, त्यांना गोमेकॉवर विश्वास नाही का? असा सवाल केला असता, आमदार, मंत्री गोमेकॉत दाखल झाल्यास त्यांच्यामुळे तेथील व्यवस्थेवर ताण पडू शकतो. डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचारी त्यांच्या दिमतीला राहिल्याने अन्य रुग्णांकडे दुर्लक्ष होऊ शकते, तसेच एखादा अत्यवस्थ तथा सामान्य रुग्ण आल्यास त्याला खाट मिळणे मुश्कील होऊ शकते, यासारख्या विविध कारणांसाठी ते खाजगी इस्पितळात उपचार करतात असा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला.
राज्यात कोरोना मृत्यूदर जादा असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. याच कालावधित गतवर्षी झालेल्या दरमहा मृत्यूंची संख्या तपासल्यास जवळजवळ एकसमान असल्याचे दिसून आले आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आतापयर्तं एक 12 वर्षीय आणि दुसऱया केवळ 8 महिन्यांच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आपण स्वतः हळहळलो. त्यासंबंधी डीन डॉ. बांदेकर यांच्याकडे चौकशी केली असता 12 वर्षांच्या मुलावर पॅन्सरचे उपचार सुरू होते तर 8 महिन्यांच्या मुलाला जन्मतः हृदयाशी संबंधित आजार होता, अशी माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी, होम आयझोलेशन किट संबंधी माहिती दिली. इम्युनिटी बुस्टर, ऑक्सिमिटर, थर्मामिटर, आणि अन्य औषधे या किटमध्ये असतील. शेजारील बांगलादेश तसेच ऑस्ट्रेलिया आदी देशात या किटचा वापर यापूर्वीच सुरू करण्यात आला असून भारतही कोरोना रुग्णांना त्याचा चांगला फायदा होईल, असे ते म्हणाले.
कोविड रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. वेगवेगळी धोरणे, प्रोटोकॉलची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यातील विविध इस्पितळात अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यात येत आहेत, वाढीव खाटांचीही व्यवस्था करण्यात येत आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पूर्ण क्षमतेने कार्यरत असून तेथे आता आणखी 200 खाटा वाढविण्यात येणार आहेत, असे राणे यांनी सांगितले.
होम आयझोलेशनमध्ये राहिलेला एखादा गरीब व्यक्ती सदरचे 2000 रुपये किंमतीचे किट विकत घेऊ शकत नाही. त्यांच्यासाठी सरकारने ही व्यवस्था केलेली आहे. एवढेच नव्हे तर कोविडची लागण होण्यापूर्वीसुद्धा काळजी घेण्यासाठी या किटचा फायदा होईल. पीएचसी, सीएचसीच्या माध्यमातून ही किट रुग्णांच्या घरी पोहोचविण्यात येणार आहे, अशी माहिती राणे पुढे दिली. या किटमुळे लोक आपल्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घेतील आणि त्याद्वारे राज्यातील मृत्यूदर निश्चितच खाली येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पीएचसी, सीएचसी पातळीवर आदर्शवत काम करणाऱया डॉक्टर्सच्या कार्याचे कौतुक करून श्री. राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच या सर्व कार्यासाठी मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण सहकार्य दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी स्वागत केले. दयानंद राव यांनी सूत्रसंचालन तर आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा यांनी आभार व्यक्त केले.