बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग कमी कमी होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्याही कमी होत आहे. दरम्यान अपेक्षित तिसर्या लाटेची तयारी करण्यासाठी कर्नाटक सरकार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प आणि अन्य पायाभूत सुविधा उपलध करून देत आहे. तसेच राज्यात बेडची संख्याही वाढवत आहे, असे प्रभारी कोविड टास्क फोर्स आणि उपमुख्यमंत्री डॉ.अश्वथ नारायण सी.एन. यांनी सांगितले. एकूणच राज्यसरकार कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यास त्यावर मात करण्यासाठी तयारी सुरु आहे.
कर्नाटक हे देशातील सर्वाधिक कोरोना पीडित राज्यांपैकी एक राज्य आहे. राज्यात आतापर्यंत २५ लाखांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३३ हजाराहून अधिक रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासह कर्नाटक रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येत दुसर्या क्रमांकावर आहे.
“दुसर्या लाटेत कोरोना विषाणूचा वेग जास्त होता त्यामुळे तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. बहुतेक राज्यांमध्ये कोरोनाचा वेग समान नव्हता. आयसीयू आणि आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर प्रचंड ताण होता. तिसर्या संभाव्य लहरीची तयारी म्हणून आम्ही आधीच पायाभूत सुविधांचा विकास करीत आहोत जेणेकरुन अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये, ” असे उपमुख्यमंत्री अश्वथ नारायण म्हणाले.