ढवळी बालिका आश्रम कोरोनामुक्त – विलगीकरण काळात मदतीला धावले अनेक हात
प्रतिनिधी/ फोंडा
मार्च महिन्यात मातृछायेच्या ढवळी येथील बालिका आश्रमातील 21 मुलींना झालेल्या कोरोनाच्या बाधेतून संस्था सुरुखप बाहेर पडली आहे. कोरोनाच्या या संक्रमणकाळात गेले वर्षभर मातृछाया तिनही आश्रमातील मुलां-मुलींच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आखत असून त्यांना गुंतवून ठेवणारे विविध उपक्रम सातत्याने राबवित आहे. दुसऱया लाटेनंतर येऊ घातलेल्या तिसऱया लाटेपासून बचाव करण्यासाठी आत्तापासूनच तयारी केलेली आहे. त्यासाठी योग्य आहार व रोग प्रतिकार शक्तीवर्धके दिली जात असल्याची माहिती मातृछायेच्या तिन्ही आश्रमाच्या प्रमुखांनी फोंडा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
ढवळी येथील बालिका कल्याण आश्रम, तळावली येथील बाल कल्याण आश्रम व मडगाव येथील बालिका कल्याण आश्रम या तिनही आश्रमांमध्ये एकूण 110 मुले असून कोरोना काळात त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात आहे. शाळा बंद असल्याने हा काळ कंठाळवाणा होऊ नये, यासाठी गेले वर्षभर मुलांना आनंद देणारे व गुंतवून ठेवणारे उपक्रम सातत्याने सुरु आहेत, अशी माहिती ढवळी आश्रमचे प्रमुख डॉ. सुभाष भोसले यांनी दिली. यावेळी तळावली बाल कल्याण आश्रमाचे प्रमुख सागर साकोर्डेकर व मडगांव बालिका कल्याण आश्रमाचे प्रमुख सुरेंद्र नाईक हे उपस्थित होते.
विलगीकरणात मुलींची अशी घेतली काळजी
गेल्या मार्च महिन्यात ढवळी बालिका कल्याण आश्रमातील 21 मुलींना कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे संपूर्ण वास्तू मायक्रो कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आली. एकेचाळीस दिवसांच्या या विलगीकरणाच्या काळात मातृछायेचे पदाधिकारी व कर्मचाऱयांनी आश्रमातील सर्व मुलांची योग्य प्रकारे काळजी घेत समर्पित होऊन सेवा दिली. कोरोनासंबंधी सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करतानाच प्रार्थना, योग, ध्यानधारणा असे उपक्रम राबविण्यात आले. याशिवाय चित्रकला, कथाकथन, शिवणकाम, स्वयंपाकात मदत व स्वच्छतेच्या कामात सहभागी करून घेत विलगीकरणाचा हा काळ या मुलांसाठी बंदिवास होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेतली गेली. विलगीकरण संपल्यानंतर आरोग्य भारतीच्या गोवा शाखेतर्फे जागतिक महिलादिन मुलींसोबत साजरा केला.
कोरोना काळात सात मुलींचे दत्तकविदान
या कठिण काळात उपजिल्हा इस्पितळ फोंडा, आयुष्य मंत्रालय, कवळे ग्रामपंचायत, मामलेदार कार्यालय, पोलीस, नागरी पुरवठा व फलोत्पादन या विविध सरकारी यंत्रणांचे विशेष साहाय्य लाभले. मातृछायेचे हितचिंतक व दात्यांनी तर मोठा आधार दिला. काही लोकांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, फळे, भाज्या पुरविल्या. हय़ुमन टच फाऊंडेशन या बिगर सरकारी संस्थेतर्फे व काही अन्य लोकांनी पीपीई कीट, मास्क, ऑक्सिमीटर, स्टीमर, हातमोजे, डिजिटल थर्मोमीटर हे आवश्यक साहित्यही मातृछायेला उपलब्ध करुन दिले. समाजाच्या विविध स्थरातून मिळालेली मदत व आधार यामुळे या कठिण परिस्थितीतून मातृछाया लवकर बाहेर पडू शकली. मदतीचे हे हात म्हणजे खऱया अर्थाने मानवतेचे दर्शन होते, असे डॉ. भोसले यांनी सांगितले. कोरोनाच्या काळात मार्च 2020 ते मे 2021 या कालावधीत सात मुलींचे दत्तकविदान झाले. शिवाय उपवर झालेल्या एका मुलीचे लग्नही लावून देण्यात आले.
बालकल्याण आश्रमातील मुलांसाठी कोरोना काळात विविध उपक्रम
तळावली येथील बाल कल्याण आश्रम कोरोनापासून सुरक्षित असला तरी तेथे वास्तव्यास असलेल्या 48 मुलांना विविध उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवण्याचे मोठे आव्हान संस्थेपुढे होते. आश्रमाचे प्रमुख सागर साकोर्डेकर तसेच अरुण धर्माधिकारी व इतर कर्मचाऱयांनी मुलांसाठी विविध उपक्रम सातत्याने सुरु ठेवले. मोठय़ा मुलांना स्वयंपाकामध्ये गुंतवितानाच इतर मुलांना भाजी लागवड, बागकाम अशा उपक्रमांमध्ये गुंतवून ठेवण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात मातृछायेच्या मुलांनी फोंडा तालुक्यात सेवा देणाऱया पोलिसांना चहा व नाश्ता पुरविला. आश्रमातील काही मुलांनी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतही भाग घेतला. लायन्स क्लबच्या क्वेस्ट एसएफए या उपक्रमात ऑनलाईन सहभाग, तसेच चित्रकला, बुद्धिबळ अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या शिवाय कोरोना महामारीच्या काळात मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी नित्य व्यायाम व सूर्यनमस्कार करून घेण्यात आले. तीस दिवसांच्या कार्यकाळात प्रत्येक मुलाने 1100 सूर्यनमस्कार घालण्याचे उद्दिष्ठ पूर्ण केले.
मडगांव येथील बालिका आश्रमामध्येही सुरेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील कर्मचारी व पदाधिकारी मुलींची योग्य प्रकारे काळजी घेत आहे. या आश्रमात एकूण 20 मुली वास्तव्यास आहेत. मुलींना स्वच्छता राखण्यापासून नियमित प्रार्थना, योगा व प्राणायाम करून घेतले जाते. तसेच चित्रकला, वाचन व अन्य उपक्रमात गुंतवून ठेवले जाते. या शिवाय तिनही आश्रमांमध्ये रामनवमी, हनुमान जयंती, आषाढी एकादशी, गोकुळाष्टमी, दहीहंडी, गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, गुरुपौर्णिमा, दिवाळी, होळी, गुढीपाडवा हे भारतीय संस्कृतीशी निगडीत सणही वेळोवेळी साजरे करण्यात आले.
कोरोनामुळे निराधार बनलेल्या मुलांना आश्रय देण्याची तयारी
कोरोनाच्या दुसऱया लाटेत गोव्यात अनेक लोकांचा अकाली मृत्यू झालेला आहे. बऱयाच कुटुंबातील कर्ते पुरुष व कमावते आधार या महामारीत बळी पडले. एखाद्या कुटुंबावर असा आघात होऊन मुलांचा आधार हरवल्यास अशा निराधार मुलांना आश्रय देण्याची तयारी मातृछायेने ठेवली आहे. एखाद्या गावात किंवा आपल्या आसपास अशा घटना आढळून आल्यास सदर कुटुंबाच्या नातलगांनी किंवा नागरिकांनी मातृछायेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मातृछाया निराधार व अनाथ तसेच विविध कारणांमुळे विघटीत झालेले कुटुंबातील मुलांना नेहमीच आश्रय देत आली आहे. कोरोनाच्या या आपत्तीत दुर्दैवाने एखाद्या कुटुंबावर असा प्रसंग ओढवल्यास व मुले निराधार बनल्यास राज्य सरकारच्या बाल कल्याण समितीमार्फत किंवा थेट मातृछायेशी संपर्क साधावा, असे संस्थेतर्फे कळविण्यात आले आहे.









