प्रत्येक नवीन वर्ष हे काहीतरी नवीन संकटे व आव्हाने घेऊन जन्मास येते. त्या आव्हानांची व संकटांची व्याप्ती जेवढी मोठी तेवढी मानव जातीची प्रगती होते. 2020 वर्ष सर्व मानव जातीपुढे फार मोठे आव्हान व संकट घेऊन उदयास येईल व सर्व मानव जातीचे व्यवहार ठप्प होतील, असे कोणास वाटले नव्हते. 2020 सालच्या जानेवारी महिन्यात चीनमधील हुवान शहरामध्ये कोरोनाच्या संकटाची जाणीव झाली होती. परंतु, ते संकट जागतिक स्वरुपाचे बनेल असे सुरुवातीला कोणास वाटले नाही. कोरोना संकटाचे पडसाद आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, मानसिक व शारीरिक स्वास्थ्य, सामाजिक अशा सर्व क्षेत्रांवर पडले.
कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी मार्चच्या तिसऱया आठवडय़ापासून 3-4 आठवडे ठाणबंदीच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी कडकपणे करण्यात आली. त्यानंतर त्यामध्ये हळूहळू शिथिलता आणण्यात आली. मोठमोठय़ा शहरातील वाहने, कारखाने आणि औद्योगिक संस्थांमुळे होणारे हवेचे प्रदूषण थांबले. शहरातील हवेच्या प्रदूषण मुक्ततेचा अनुभव लोकांनी घेतला. त्यामुळे यापुढील काळात शहराचे विस्तारीकरण किती करणार व मानव जातीचे जीवन किती धोक्मयात आणणार, हाही संदेश कोरोनाने आपणास दिला आहे. कोरोनाने ज्ये÷ नागरिकांना सक्तीने घरामध्ये बसण्याची सवय लावली. उतरत्या वयात आत्मचिंतन करून थोडातरी जीवनाचा अर्थ समजून घ्यावा, हा संदेश कोरोनाने ज्ये÷ नागरिकांना दिला. काही काळ एकांतवास व समाजापासून स्वतःला विलगीकरण हे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे आहे. ही संतांची व आपल्या संस्कृतीची शिकवण आपण पार विसरून गेलो होतो. कोरोनाच्या संकटामुळे याची जाणीव आपणास प्रखरतेने झाली. कारण विलगीकरण हा कोरोनाशी सामना करण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय होता. घातक विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी मास्क हा एक महत्त्वाचा उपाय आहे, ही कोरोनाने आपणास जाणीव करून दिली. त्याचबरोबर हात धुण्याच्या व स्वच्छतेच्या सवयीमुळे मानव स्वच्छतेच्या पाठीमागे हात धुवून लागला. धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, देवालये, मशिदी, चर्च व बुवामहाराजांचे आश्रम ही मानवी मनाच्या जडणघडणीसाठी आवश्यक असली तरी त्या ठिकाणी किती गर्दी करावी हा सद्विवेक आपण विसरलो. देवाच्या नावावर चालणारा भ्रष्टाचार व राजकारणही आपण पाहिले. 7-8 महिने देवालये व धार्मिक स्थळे बंद होती. परमेश्वराचे अस्तित्व नसानसातून भरून राहिले आहे. तो सर्व ठिकाणी व सर्व वेळी आहे. आपले शरीर हे सुद्धा एक देवालय असून जनसेवा हीच ईशसेवा असा संतांनी सांगितलेला मौलिक उपदेश आपण विसरलो होतो. धार्मिक स्थळातील व देवालयातला देव आपणास कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी व पोलीस यांच्या रूपाने पहावयास मिळाला. संतांच्या उपदेशाचे प्रात्यक्षिक व कोरोनाने आपणाकडून करून घेतले.
योगासने, प्राणायाम, आयुर्वेद या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठीच्या शास्त्रांची कसोटी कोरोनाच्या संकट काळात लागली. रोग होण्यापेक्षा रोग होऊ नये व निसर्गाकडूनच रोग निर्माण होतात व नैसर्गिक उपायाने त्यावर मात करता येते या तत्त्वज्ञानावर आयुर्वेदाची उभारणी झाली आहे. या पुढील काळात आयुर्वेदावर अधिक संशोधन होणे जरुरीचे आहे. हाही संदेश आपणास कोरोनामुळे मिळाला. विसाव्या शतकातील चौथ्या डिजिटल औद्योगिक क्रांतीने सारे जग व्यापून टाकले आहे. दृकश्राव्य माध्यम, ई-कॉमर्स, ई-लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, माहिती ज्ञानाचे प्रचंड प्रमाणात आदान-प्रदान, माहिती-तंत्रज्ञान, घरातून काम, ऑनलाईन शिक्षण पद्धती ही त्याची विविध रूपे. कोरोनाच्या संकटापूर्वी या औद्योगिक क्रांतीचे पडसाद रोजच्या जीवनात पडू लागले होते. परंतु, अधिक गती कोरोनाच्या संकटामुळे प्राप्त झाली. प्रत्यक्ष वर्गात शिकवण्याला ऑनलाईन शिक्षण पद्धती ही जरी समर्थ पर्याय देऊ शकत नसली तरी पूरक पर्याय देऊ शकते. येथून पुढील काळात शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड बदल घडू शकतात. 2020 साल हे कोरोनाचे वर्ष म्हणून इतिहासात नोंद होईल. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक स्थिती डबघाईला आली. हजारो लोकांचे रोजगार धोक्मयात आले. स्थलांतरित मजुरांचे हाल झाले. लाखो लोक मृत्युमुखी पडले. कित्येक लोकांना आपल्या प्रियजनांचे शेवटचे दर्शनही घेता आले नाही. अशा संकटामधून व त्यातून मिळणाऱया संधीतूनच मानवाची प्रगती होते व नव्या संकटाला तोंड देण्यास मानवी जीवन सज्ज होते. इतिहासातील जुनी संकटे नवीन संकटाच्या मानाने किरकोळ वाटतात. काळाच्या उदरात ‘कोरोनाचा रोगी कळवा व हजार रुपये मिळवा’ अशी पहाट उदयास येणार आहे. तोपर्यंत वाट पहावी लागणार हे मात्र खरे.
प्रा. डॉ. भगवान वालवडकर








