सरन्यायाधीश मोगोइंग मोगोइंग बरळले : दक्षिण आफ्रिकेतील प्रकार
दक्षिण आफ्रिकेचे सरन्यायाधीश मोगोइंग मोगोइंग यांनी कोरोना लसीसंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. जगभरात ज्या लसीची आतुरतेने उत्सुकता आहे, ती सैतानाकडून प्राप्त झाल्याचे मोगोइंग बरळले आहेत. अत्यंत प्रभावशाली व्यक्तीच्या अशाप्रकारच्या विधानामुळे लोकांमध्ये गोंधळ होऊ शकतो असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.
समाजमाध्यमांवर चित्रफित
सरन्यायाधीश एका चर्चमध्ये प्रार्थना करत असतानाची चित्रफित समाजमाध्यमांवर अत्यंत वेगाने प्रसारित होत आहे. लस लोकांच्या डीएनएला खराब करणार आहे. ईश्वराकडून प्राप्त नसलेल्या कुठल्याही प्रकारच्या लसीला दूर ठेवणार आहे. एखादी लस सैतानाकडून आली असेल आणि त्याचा उद्देश लोकांच्या जीवनात ट्रिपल सिक्स (सैतानाचे चिन्ह) आणणे आहे, अशी कुठलीही लस नष्ट व्हावी, अशी विचित्र प्रार्थना करत असताना सरन्यायाधीश यात दिसून येतात.
वैज्ञानिकांकडून टीकास्त्र
मोगोइंग यांच्या या विधानांमुळे वैज्ञानिक तसेच सर्वसामान्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. उच्च पदावरील व्यक्ती लोकांची दिशाभूल करत असल्याने ते दुर्दैवी आहे. या महामारीला नियंत्रित करण्यासाठी लस एक महत्त्वाचा हिस्सा असल्याचे उद्गार विट्स विद्यापीठातील वायरोलॉजीचे प्राध्यापक बॅरी शउब यांनी काढले आहेत.









