क्रांतीदिन सोहळय़ातून मंत्री गोविंद गावडे यांचे आवाहन
प्रतिनिधी / फोंडा
मुक्तीलढयासाठी ज्या स्फूर्तीने व ध्येयाने असंख्य स्वातंत्र्यसैनिक झुजत आले, तशाच प्रकारची एकजूट कोरोनाच्या लढय़ात समस्त गोमंतकीयांना दाखविण्याची वेळ आली आहे. आजची ही लढाई वेगळी असली तरी या जागतीक महामारीवर मात करण्यासाठी खबरदारी व सहकार्याची भावना तेवढीच महत्वाची आहे असे आवाहन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.
फोंडा येथील शासकीय क्रांतीदिन सोहळय़ात ते बोलत होते. क्रांती मैदानावरील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून मंत्री गोविंद गावडे यांनी मुक्तीलढयातील हुतात्म्याना आदरांजली वाहिली. कोरोना ही जागतीक आपत्ती आहे. भारत व गोवा सरकार विविध पातळय़ावर या संकष्टाचा प्रतिकार करीत आहे. सरकारच्या या प्रयत्नात जनतेची योग्य साथ मिळाल्यास आपण निश्चित ही लढाई जिंकू असा विश्वासही मंत्री गोविंद गावडे यांनी व्य़क्त केला.
गोवा मुक्तीसंग्रामाच्या ईतिहासात आजच्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. 19 डिसें. 1961 या दिवशी गोवा मुक्त झाला तरी त्याची ठिणगी 18 जून 1946 रोजी पडली होती. मुक्त गोव्यात स्वातंत्र्याची फळे चाखताना त्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा त्याग व बलिदान कायम ह्य्दयात जपून भविष्याची वाटचाल करावी लागेल.
कोरानाच्या लढाईत जीव धोक्यात घालून आघाडीवर लढणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, गृहरक्षक या सर्वांना पाठबळ देण्याची गरज आहे. या आणीबाणीच्या काळात सरकारच्या निर्णयाकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहणे योग्य नाही. सहकार्याची भावनाच या संकटावर मात करण्यासाठी बळ देणार आहे, असे मंत्री गावडे पुढे म्हणाले.
फोंडय़ाचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक, नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक, उपनगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, उपजिल्हाधिकारी केदार नाईक, स्वातंत्र्यसैनिक गोविंद चिमुलकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. फोंडा पोलीस पथकाकडून मानवंदना स्वीकारण्यात आली. सरकारी खात्यातील महिला कर्मचाऱयांनी समुहगीत सादर केले. गिरीश वेळगेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.









