ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोरोना महासाथीचा जोर ओसरत असताना पुन्हा एकदा नव्या संकटाने तोंड वर काढले आहे. कोरोनानंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे. कारण कोरोनाचा नवा सापडला असून तज्ज्ञांनी हा वेरिएंट घातक असल्याचे सांगितले आहे . दक्षिण आफ्रिकेत आढळलेला ‘बोत्सवाना व्हेरिएंट’ बाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांनी जगाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. या व्हेरिएंटनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर भारतातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या या नव्या वेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या नव्या व्हेरियंटच्या धोक्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार सतर्क झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विमान सेवेवर मुंबईत बंदी घालण्याचा विचार राज्य सरकार कडून सुरु असल्याचे समोर येत आहे. तर ३ डिसेंबरला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यावरही या नव्या व्हायरसचा परिणाम होऊ शकतो. वानखेडेवरील सामन्यासाठी प्रेक्षक क्षमता ५० टक्के करण्याचा सरकारचा विचार असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला होता. आफ्रिका खंडातील इतर देशांमध्येही कोरोनाच्या या नव्या विषाणूचा संसर्ग फैलावला आहे. बोत्सवानामध्ये या नव्या व्हेरियंटचे 32 म्युटेशन आढळले आहेत. हा व्हेरिएंट अधिक वेगाने फैलावत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डीसीजीएची आज बैठक
दक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या विषाणूचं भय वाढत चाललेलं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नवीन व्हेरिएंट अधिक धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. हा धोका लक्षात घेता अमेरिकासह अनेक देशांनी प्रवासावरील निर्बंध वाढवले आहेत. याबाबत भारत सरकारही निर्णय घेणार असल्याचं वृत्त आहे. आज शनिवारी डीजीसीए याबाबत एक बैठक घेणार आहे. यामध्ये नवीन व्हेरिएंट आढललेल्या देशातून येणाऱ्या विमानप्रवासावर निर्बंध अथवा या देशातून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवसांचं क्वारंटायन बंधनकारक करण्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो.