वार्ताहर / पाचगाव
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन तीन महिन्याचा पगार ग्रामपंचायतीच्यावतीने बोनस म्हणून देणार असल्याचे पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांनी जाहीर केले .
पाचगाव मध्ये 15 जुलै रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता .त्यानंतर आज अखेर कोरोना आजाराचे चारशे पेक्षा जास्त रुग्ण पाचगाव मध्ये आढळले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या घराचे निर्जंतुकीकरण करणे ,त्या परिसरात औषध फवारणी करणे ,घर टू घर सर्वेक्षणात संबंधित पथकाला मदत करणे तसेच गावची स्वच्छता राखण्यात या कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे .
या त्यांच्या कार्याची दखल घेत पाचगाव ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायतीच्या 49 कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा पगार बोनस म्हणून जाहीर केला आहे. घर टू घर सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचाही सत्कार पाचगावचे सरपंच संग्राम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बबन पाटील यांनीही बोलताना सांगितले की कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांनी गावाच्या स्वच्छतेमध्ये व कोरोना आजाराला आळा घालण्यासाठी महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे.
त्यांच्या कार्याची पाचगाव ग्रामपंचायतीने दखल घेतल्याबद्दल राज्य उपाध्यक्ष बबन पाटील यांनी समाधान व्यक्त केले . पाचगावचे उपसरपंच विष्णू डवरी ,माजी उपसरपंच प्रकाश गाडगीळ, संग्राम पोवाळकर, प्रवीण कुंभार, सुशांत शेटगे यांनीही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले .









