इचलकरंजी/ प्रतिनिधी
डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅन्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट मध्ये टेक्स्टाईल केमिस्ट्री विभागात कार्यरत असणारे प्रा.आर.एच. देशपांडे यांनी अॅन्टीबॅक्टेरीयल व अॅन्टीव्हायरल या दोन्ही गुणधर्माचा अंतर्भाव असलेल्या नॅनो फिनीशची निर्मिती केली आहे व हे फिनिश अगदी सर्व सामान्यांना परवडेल अशा वाजवी किंमतीत उपलब्ध आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्क वापरणे हे अपरिहार्य झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील मास्क वापरण्याचे आदेश दिले आहेत. सध्या बाजारात वोव्हन, निटेड व नॉन वोव्हन अशा तिन्ही प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. थ्री लेयर मास्क, अॅन्टीबॅक्टेरीयल मास्क, एन-९५, एन-९९ असे विविध प्रकारचे मास्कची मागणी सतत वाढत आहे. एन-९५, एन-९९ या मास्कमध्ये अनुक्रमे ९५ % व ९९ % सुक्ष्मजंतू व कण (०.३ मायक्रॉन) फिल्टर होतात. पण काही विषाणू हे अतिसुक्ष्म म्हणजे (१०० नॅनोमीटर – ३०० नॅनोमीटर) या आकाराचे असलेने ते या अशा मास्कमधून आरपार जावू शकतात. या मास्कमध्ये ऑइल रोध करण्याची क्षमता कमी असल्यामुळे इनव्हलपड व्हायरस यातून संक्रमित होवू शकतात. फिल्टरेशन क्षमता वाढवण्यासाठी टू लेयर, थ्री लेयर मास्कची निर्मिती करण्यात येते व त्याचबरोबर कापडाला अॅन्टीबॅक्टेरीयल केमिकलचे कोटींग देण्यात येते. पण कोटींगमुळे कापडाची ब्रीदेबीलीटी कमी होते. व मास्क घातलेल्या व्यक्तीस श्वासोच्छवास घेण्यास त्रास होतो, व्यक्तीस गुदमरल्यासारखे होते तसेच अॅन्टीबॅक्टेरीयल कोटींगमुळे प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे असणारे अॅरोबीक बॅक्टेरीया नष्ट होतात व अप्रत्यक्षरीत्या अनअॅरोबीक बॅक्टेरीया वाढतात व ते शरीराला धोकादायक ठरु शकतात.
या सर्व बाबींचा रीतसर अभ्यास व अॅनॅलीसीस करुन डीकेटीईत टेक्स्टाईल केमिस्ट्री विभागात गेली १४ वर्षे कार्यरत असणारे प्रा. आर.एच. देशपांडे यांनी नॅनो फिनीशचे संशोधन केले आहे. व त्यांनी विविध कापडावर या फिनिशचा वापर करुन तयार कापडाची मुंबई येथील अत्याधुनिक मशिनरीवर अॅन्टीव्हायरल व अॅन्टीबॅक्टेरीयल गुणधर्माची चाचणी केली व तयार कापड मास्क व पिपीई कीट बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त असून नॅनो फिनिश हे कापडावर अंतर्भूत होत असल्याकारणाने कापडाची ब्रीदेबीलीटी देखील टिकून राहते असा निष्कर्ष काढला.
या कापडापासून मास्क बनवण्याचे काम डीकेटीईमध्ये वेगाने सुरु आहे. इंडस्ट्रीने या फिनिशचा वापर करुन मास्क व पिपीई कीटची निर्मिती केल्यास लवकरच ते सर्वासाठी उपलब्ध होतील.
या फिनिशचे डिझाइन करताना प्रा. देशपांडे यांना डीकेटीईचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही.कडोले व उपसंचालक प्रा.डॉ.यु.जे. पाटील यांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे.