ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्लीत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने तेथील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासोबत आज सकाळी 11वाजता बैठक बोलावली आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया, दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित असतील. या बैठकीत कोरोनाच्या दिल्लीतील सध्यस्थितीबाबत आणि उपाययोजनांबाबत चर्चा होईल. त्यानंतर 6 वाजता अमित शाह यांनी याच मुद्द्यावर दुसरी बैठक बोलावली आहे. या बैठकीला दिल्ली महानगरपालिकेचे सर्व महापौर उपस्थित असतील. या व्यतिरिक्त दिल्लीचे मुख्यमंत्री आणि दिल्लीचे उपराज्यपाल उपस्थिती राहतील.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये कोरोनाने मृत्यू झालेले आणि सध्या कोरोनाग्रस्त असलेल्या रूग्णांना जनावरांपेक्षाही भयानक वागणूक दिली जात असल्याची चपराक सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला लगावली होती.









